मुंबईत भाजपा-शिवसेना वाद पेटला; आशिष शेलारांच्या जामिनानंतर भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 11:17 AM2021-12-10T11:17:15+5:302021-12-10T11:17:43+5:30

वरळीतील सिलिंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करतेवेळी आशिष शेलारांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यामुळे नव्या वादात भर पडली.

BJP-Shiv Sena clashes due to Statement over Mumbai Mayor; BJP aggressive after Ashish Shelar's bail | मुंबईत भाजपा-शिवसेना वाद पेटला; आशिष शेलारांच्या जामिनानंतर भाजपा आक्रमक

मुंबईत भाजपा-शिवसेना वाद पेटला; आशिष शेलारांच्या जामिनानंतर भाजपा आक्रमक

Next

मुंबई  : महापौर किशोरी पेडणकेर यांच्या तक्रारीवरून भाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. गुरुवारी आशिष शेलार यांचा जबाब नोंदवून एक लाख रुपयांवर त्यांना टेबल जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी मरिनलाईन्स पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे बडे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ देत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत पोलिसांत तक्रार दिली आहे.

वरळीतील सिलिंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करतेवेळी आशिष शेलारांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यामुळे नव्या वादात भर पडली. बुधवारी रात्री पेडणेकर यांच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर गुरुवारी सकाळपासून भाजप कार्यकर्त्यांनी सुरुवातीला शेलार यांच्या घराबाहेर गर्दी केली. त्यानंतर, भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि अतुल भातखळकर यांच्यासह भाजप नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. त्यांच्या जामिनासाठी घोषणाबाजी करण्यात आली.  पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून झाल्यानंतर त्यांना एक लाख रुपयांच्या सशर्त टेबल जामीन मंजूर केला आहे. यावेळी प्रसाद लाड जामीनदार म्हणून उपस्थित होते. 

दुसरीकडे  भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या एका मुलाखतीचा संदर्भ देत त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी भाजप नगरसेविका शीतल गंभीर यांनी राऊत यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘सर्वांना समान न्याय हवा. पोलिसांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, अन्यथा भाजपचे आणखी हजारो कार्यकर्ते याठिकाणी दाखल होतील, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार, दुपारी दीडच्या सुमारास भाजप कार्यकर्ते तेथून निघून गेले. मुंबई पोलीस आणि राज्य सरकार या सगळ्यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. 

गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव 
राजकीय आकसापोटी आपल्याविरोधात खोटा  गुन्हा दाखल करण्यात आल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. या सगळ्यामागचा बोलविता धनी कोण आहे, हे बाहेर काढणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. तसेच दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: BJP-Shiv Sena clashes due to Statement over Mumbai Mayor; BJP aggressive after Ashish Shelar's bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.