BJP - Shiv Sena Alliance: का आणि कशी झाली युती?.... सांगताहेत स्वतः मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 08:38 PM2019-02-18T20:38:45+5:302019-02-18T20:46:32+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीआधी सेना-भाजपा युती तुटली होती आणि पुढची साडेचार वर्षं त्यांच्यात रस्सीखेच सुरू होती.
भाजपा आणि शिवसेना यांची युती होणार की नाही, यावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना आज अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा केली. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी सेना-भाजपा युती तुटली होती आणि पुढची साडेचार वर्षं त्यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे आता आपण पुन्हा कसे आणि का एकत्र आलो, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. ते नेमकं काय म्हणाले, हे त्यांच्याच शब्दांत...
>> महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात २५ वर्षं युती म्हणून आम्ही एकमेकांसोबत काम करतोय. काही मुद्द्यांवर मतभेद झाले असतील, परंतु हिंदुत्व हा मूळ विचार आहे आणि त्यानेच आम्हाला इतकी वर्षं जोडून ठेवलं.
>> विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही कारणाने सोबत राहू शकलो नाही. परंतु, त्यानंतर गेली साडेचार वर्षं केद्रात आणि राज्यात एकत्र सरकार चालवत आहोत.
>> आज ज्यावेळी देशात काही लोक एकत्र येऊन राष्ट्रीय विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करताहेत, त्यावेळी राष्ट्रीय विचारांचे पक्ष एकत्रित आले पाहिजेत ही जनभावना होती. त्याच जनभावनेचा आदर राखला आहे. आम्ही पुन्हा या ठिकाणी लोकसभा, विधानसभा सर्व निवडणुकांकरिता एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे.
>> केवळ सत्ता, पदे, यापुरता मर्यादित विचार न करता मोठी वैचारिक चर्चा करून युतीचा निर्णय घेतला आहे. काही मुद्दे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले. त्यावर चर्चा झाली. सामान्य माणूस, शेतकरी, गरीबांचं हित साधता येईल याचा व्यापक विचार करून युतीचा निर्णय घेतला आहे.
>> अयोध्येत प्रभू श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे ही आग्रही मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. भाजपाही त्यांच्याशी सहमत आहे. अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ते लवकरात लवकर व्हावं यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. केंद्र सरकारनेही त्यादृष्टीने पावलं उचलली आहेत. ६३ एकर जमीन न्यासाला देऊन मंदिराचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केंद्राने केला आहे.
>> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, असा आग्रह उद्धव ठाकरेंनी आग्रह ठेवला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी देण्यात आली आहे. काही शेतकरी तांत्रिक कारणामुळे या योजनेपासून वंचित राहिले, बँकानी पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य केलं नाही, अशा गोष्टी उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे जे राहिले असतील, त्यांना सर्व लोकांना कर्जमाफी देण्याचा सरकार प्रयत्न करेल.
>> नाणारच्या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा शिवसेनेकडून मांडण्यात आला. स्थानिकांच्या पाठिशी आम्ही उभे आहोत. लोकांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी करता येईल, तिथे हा प्रकल्प नेला जाईल.
>> मुंबई, ठाण्यात ५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेत राहणाऱ्या नागरिकांना करमाफी देण्याबाबतही विचार झाला आहे.
>> व्यापक जनहिताच्या मुद्द्यांवर चर्चा करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
>> लोकसभा निवडणुकीत २३ जागा शिवसेना लढवेल आणि २५ जागा भाजपा लढवेल. विधानसभा निवडणुकीवेळी मित्रांशी चर्चा करून उर्वरित जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेणार.
"आगे बढ़ेंगे तो साफ मनाने और दिलसे आगे बढ़ेंगे"
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 18, 2019
-शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे pic.twitter.com/lSfTy67egO
युतीच्या घोषणेबरोबरच जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला, दोन्ही पक्ष लढवणार एवढ्या जागा https://t.co/PMVpQVk48U
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 18, 2019
Interacting with media with our Rashtriya Adhyaksh @AmitShah ji & ShivSena leader Uddhav ji Thackery. https://t.co/BzpNEsJuXz
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 18, 2019