भाजपा-शिवसेनेत वाक्युद्ध, नेत्यांची पातळी सोडून टीका, दोन्ही पक्षांनी काढली उणीधुणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 01:22 AM2017-09-24T01:22:54+5:302017-09-24T01:23:16+5:30
महागाईविरुद्ध शिवसेनेच्या आंदोलनावरून शनिवारी भाजपा-शिवसेनेत वाक्युद्ध रंगले. मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज त्यांच्या विरोधी घोषणा देतात.
मुंबई : महागाईविरुद्ध शिवसेनेच्या आंदोलनावरून शनिवारी भाजपा-शिवसेनेत वाक्युद्ध रंगले. मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज त्यांच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात, असे टिष्ट्वट मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केले. त्यावरून सेना व भाजपात वाक्युद्ध रंगले.
शेलारांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे प्रवक्ते आ. अनिल परब यांनी, आशिष शेलार हे मातोश्रीचे पाय चाटत चाटत मोठे झाले आहेत. त्यांनी २०१४च्या आधीचा काळ आठवावा, साहेबांच्या भेटीसाठी ते तासनतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे हे विसरु नये. त्यामुळे कोण कोणाच्या जीवावर मोठं झालंय हे लोकांना माहिती आहे, असे सुनावले. त्यावर कुणाचे पाय चाटत राजकारणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही, असा टोला शेलार यांनी हाणला.
नवरात्रीत शिमगा करणाºयांना आईभवानी विवेकबुद्धी दे! ज्यांची एकही निवडणूक लोकांमधून लढवण्याची औकात नाही. अशांनी माझ्यासारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर बोलू नये, असे टिष्ट्वट शेलार यांनी केले.
मातोश्री हे माझ्यासाठी मंदिर आहे, त्याचे पाय धुवायची आणि चाटायची माझी तयारी आहे. पालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो आहोत. कधीही खाल्ल्या ताटात घाण केली नाही, असा प्रतिटोला परब यांनी हाणला. त्यावर शेलार म्हणाले, मी कमळाच्या चिन्हावर निवडून आलो. पाठिंबा काढल्यावरच औकात कळेल. कुणाच्या मेहेरबानीवर जिंकलो नाही. तुमचे मंत्री आमच्या पाठिंब्यावर बनले आहेत. अनिल परबांना त्यांच्या स्वभावासाठी शुभेच्छा.
महागाईवरून ‘हातघाई’
महागाई व इंधन दरवाढीविरुद्ध शिवसेनेने मुंबईसह राज्यभर मोर्चे, निदर्शने केली. नागपुरात मोर्चात बैलगाडी आणली. त्यावर पेट्रोल नसलेली दुचाकी ठेवून इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला. पंतप्रधान मोदी यांनी सामान्यांसाठी ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा दाखविली होती. मात्र, पेट्रोल ८० रुपयांवर पोहचले, हेच का अच्छे दिन, असा सवालही शिवसेनेतर्फे करण्यात आला.
दसरा मेळाव्याकडे लक्ष
शिवसेनेच्या मुखपत्रातून सरकारवर होणारी जहाल टीका, आजचे आंदोलन आणि दोन्ही पक्षांतील वाक्युद्ध यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता वाढली आहे.
जे मोदी यांच्या नावाने निवडून आले, तेच मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात!
-आ. आशिष शेलार, मुंबई भाजपाचे अध्यक्ष
आशिष शेलार हे अनेकदा मातोश्रीचे पाय चाटत आले आहेत.
- आ. अनिल परब, शिवसेनेचे प्रवक्ते