भाजपा आणि शिवसेनेच्या महिला नेत्यांमध्ये अंधेरी येथील कोरोना सेंटरवर आज बाचाबाची झाली आहे. अंधेरी स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथील लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांत हाणामारीचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर आणि शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल या आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहल्या होत्या. मात्र, पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन आरोप प्रत्यारोपांची शहनिशा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं. राजुल पटेल या बेसावध असताना आकृती प्रसाद यांनी मागून त्यांना खेचले आणि केस ओढले. त्यामुळे त्या कूपर हॉस्पिटलमध्ये एमआरआयसाठी गेल्या होत्या. शिवसेनेने देखील भाजपाच्या गुंडगिरीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती एका शिवसैनिकाने दिली. अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील कोरोना सेंटरवर हा प्रकार घडला. ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू असताना दोन्ही पक्षाच्या महिला नेत्या आमनेसामने आल्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. तर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. शिवसेना आणि भाजपच्या महिला नेत्यांनी थेट आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली असून लेखी तक्रार दाखल केली आहे.
आज सकाळी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. भाजपच्या आमदार भारती लव्हेकर, नगरसेवक योगीराज दाभाडेकर आणि रंजना पाटील आणि शिवसेना नगरसेविका राजूल पटेल उपस्थित होते. सकाळी 11.30 च्या सुमारास लस देण्यावरून पटेल आणि लव्हेकर यांच्यात वाद झाला. शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे भारती लव्हेकर या आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहेत. माझ्या वर्सोवा विधानसभेच्या परिसरात लसीकरणाचा कार्यक्रमासाठी आम्ही आलो होतो. इतक्यात आमच्यावर शिवसेनेच्या टोळीने हल्ला केला. आमच्या नगरसेविका रंजना पाटील यांना धक्काबुक्की केली. तर आमच्या उर्मिला गुप्तता यांना जमिनीवर पाडलं आणि चष्मा तोडला. त्यांची साडी ओढली, अश्लील शिवीगाळ केली. हे सर्व निषेधार्य असल्याचं भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी माहिती दिली. हारून खान आणि नगरसेविका राजुल पटेल, सुबोध चिटणीस यांनी हल्ला केला. सुबोध चिटणीस आणि हारून खान यांनी उर्मिला गुप्ता यांना जमिनीवर पाडलं. भाजपचे आमदार आणि नगरसेवक मनपाच्या कार्यक्रमात येऊन गोंधळ घालतात, हा कार्यक्रम राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा नाही, त्यामुळे मनपाच्या कार्यक्रमात श्रेय लाटण्याचं काम करतात, असा आरोप शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांनी केला आहे. तसेच त्या म्हणाल्या, बाहेर लसीकरणासाठी गर्दी वाढत असताना सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी मी भाजपाच्या कार्यकर्त्यांना गर्दी कमी करण्यास सांगितली. त्यावेळी त्यांनी उलट उत्तर देत तुमच्या कार्यकर्त्यांनी गर्दी कमी करा सांगून आमच्यावर हल्ला केला.
डॉ.भारती लव्हेकर या वर्सोव्याच्या आमदार असून राजुल पटेल या पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा व शिवसेनेच्या महिला विभाग संघटक आहेत.