मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची चर्चा येत्या आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. युतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटणे कठीण असले तरी युती करायचीच अशी दोन्ही बाजूंची भूमिका असल्याने तोडगा निघेल, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.सूत्रांनी सांगितले की, अनौपचारिकरीत्या दोन्ही पक्षांचे काही नेते युतीच्या दृष्टीने एकमेकांच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीत युतीने जबरदस्त यश मिळविले होते. नवी दिल्लीत काल महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात तयारीबाबत भाजपची बैठक झाली. या बैठकीतही युतीच्या दृष्टीने लवकरात लवकर चर्चा सुरू करावी, असे ठरविण्यात आले.लोकसभा निवडणुकीच्या आधी युती जाहीर करताना विधानसभा निवडणुकीत फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्यूला असेल आणि दोन्ही पक्ष प्रत्येकी १४४ जागा लढतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर देशात ३०० हून अधिक जागा मिळाल्या. राज्यात १२२ आमदार असलेला भाजप १४४ जागा युतीमध्ये स्वीकारेल का हा प्रश्न आहे. सूत्रांनी सांगितले की, युतीबाबतच्या चर्चेत भाजप १८० जागा मागण्याची शक्यता आहे.छोट्या मित्रपक्षांमुळे भाजप झाला हैैराणसूत्रांनी सांगितले की, रासपचे नेते आणि राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी युतीमध्ये भाजपने रासपसाठी ३५ जागा सोडाव्यात अशी मागणी केली आहे. दुसरीकडे रिपाइंचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपाइंसाठी ३० जागांची मागणी केली आहे. लहान मित्रपक्षांच्या या मागणीने भाजप सध्या हैराण आहे.
भाजप-शिवसेना जागा वाटपाची चर्चा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 5:02 AM