जकात नाक्यांवरून रंगणार भाजपा-शिवसेना संघर्ष
By admin | Published: August 21, 2015 01:13 AM2015-08-21T01:13:29+5:302015-08-21T01:13:29+5:30
जकात चुकवून मुंबईत येणाऱ्या वाहनांना चाप लावण्याकरिता आणि मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे नुकसान टाळण्याकरिता टास्क फोर्स नेमून चौकशी करण्याचे
मुंबई : जकात चुकवून मुंबईत येणाऱ्या वाहनांना चाप लावण्याकरिता आणि मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे नुकसान टाळण्याकरिता टास्क फोर्स नेमून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना दिले आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या मागणीवरून ही चौकशी जाहीर झाली असून जीएसटी लागू करताना जकात चौक्या गेल्याने मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार या शिवसेनेच्या भूमिकेला एक प्रकारे धक्का देण्याचा प्रयत्न भाजपाने याद्वारे केला आहे.
काही व्यापारी, अनधिकृत एजंट, मालवाहतूकदार व जकात नाक्यांवरील अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने जकात चोरी सुरू आहे, अशी बाब गेल्या काही दिवसांत निदर्शनास आली आहे. महापालिका याबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसून येत नाही.
त्यामुळे टास्क फोर्समार्फत चौकशीत या सर्व बाबींचा सोक्षमोक्ष लागेल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करताना मुंबईतून केंद्राला मिळणारा कराचा पैसा परत मुंबईला कसा मिळणार, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. अशावेळी जकात नाक्यावरील चोरीची चौकशी लावून भाजपाने शिवसेनेच्या दाव्याला काटशह दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)