भाजपा-सेना संघर्ष चिघळणार

By admin | Published: October 14, 2016 06:58 AM2016-10-14T06:58:34+5:302016-10-14T06:58:34+5:30

दसऱ्याच्या दिवशी पालिकेच्या भ्रष्टाचाररूपी रावणाच्या दहनावरून सेना आणि भाजपात पेटलेला वाद आता आणखीनच चिघळण्याची चिन्हे

BJP-Shiv Sena will get angry | भाजपा-सेना संघर्ष चिघळणार

भाजपा-सेना संघर्ष चिघळणार

Next

मुंबई : दसऱ्याच्या दिवशी पालिकेच्या भ्रष्टाचाररूपी रावणाच्या दहनावरून सेना आणि भाजपात पेटलेला वाद आता आणखीनच चिघळण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी मुलुंड न्यायालय परिसरात त्याचीच झलक दिसून आली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १४ कार्यकर्त्यांना न्यायालयात आणण्याची माहिती मिळताच, शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनात न्यायालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे पालिका निवडणुकीत सेना-भाजपा हा वाद आता चर्चेचा विषय ठरणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे. अटक केलेल्या आरोपींना २७ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
मुलुंड नीलमनगर येथे भाजपा खा. किरीट सोमय्या यांनी १० आॅक्टोबरला पालिकेच्या भ्रष्टाचाररूपी रावण दहनाचे आयोजन केले होते. या वेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला. त्या वेळी दोन्ही पक्षांचे नेते आपआपसांत भिडल्याने वाद झाला. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हात उगारला असताना पोलीस मात्र भाजपा नेत्यांचीच पाठराखण करत असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्ते करत आहेत.
सकाळी १० वाजल्यापासून मुलुंड न्यायालयाबाहेर पूर्व उपनगरातील सेना कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. यासाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटाही तैनात केला. या वेळी सेना आमदार सुनील राऊत, अ‍ॅड. अनिल परब यांच्यासह विभागप्रमुख, शाखाध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. चौदाही अटक केलेल्या सेना पदाधिकाऱ्यांना तीनच्या सुमारास न्यायालयात आणले. या वेळी सेना कार्यकर्त्यांनी त्यांचा जयघोष करत सोमय्या यांच्याविरुद्ध जोरदार नारेबाजी सुरू केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सुनावणीवेळी राऊत आणि परब न्यायालयात हजर होते. आरोपींच्या बाजूने पाच वकिलांनी युक्तिवाद केला. सोमय्या मात्र न्यायालयात अनुपस्थित होते. या वेळी वकिलांनी केलेल्या युक्तिवादात भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचे म्हटले. शिवसैनिकांची बाजू ऐकून न घेतल्याचा आरोप ते आता पोलिसांवर करत आहेत. दोघांची तक्रार नोंदवून घेतली असती तर यात
आरोपींना जामीन मिळणे शक्य होते.
३२६ कलम जाणीवपूर्वक लावल्याचा युक्तिवादही शिवसेनेच्या वकिलांनी केला. न्यायालयाने या प्रकरणी तक्रारदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करत भाजपा नेते या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर दंडाधिकाऱ्यांनी १४ आरोपींना २७ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
सोमय्या यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांना पत्र लिहून शिवसेना पदाधिकारी आपल्या हत्येच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला आहे.
सुनावणीनंतर सेना कार्यकर्त्यांनी सोमय्यांविरुद्ध नारेबाजी केली. या वेळी भाजपाचा एकही नेता न्यायालय परिसरात नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: BJP-Shiv Sena will get angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.