Join us

पालघरमध्ये भाजपाला धक्का, वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत केला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 9:48 PM

भाजपाचे पालघरमधील माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. 

मुंबई - भाजपाचे पालघरमधील माजी खासदार दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबाने आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ‘भाजपाने आमच्या कुटुंबाला वा-यावर सोडले आहे’, अशी खंत वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.चिंतामण वनगा यांचे गेल्या जानेवारीत दिल्लीत निधन झाले होते. त्यामुळे पालघरमध्ये २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असलेले श्रीनिवास म्हणाले की, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फोनवरून आणि एसएमएसवरून भेट मागितली; पण त्यांनी काही वेळ दिली नाही. भाजपाने माझ्या कुटुंबीयांची अवहेलना केली आहे. माझ्या वडिलांनी भाजपासाठी हयात घालविली. आज मातोश्री गाठून शिवसेनेत प्रवेश करण्याची वेळ भाजपानेच आपल्यावर आणली आहे, असे श्रीनिवास यांनी पत्रकारांना सांगितले, तेव्हा ते भावूक झाले. सोबत त्यांच्या आईदेखील होत्या.

वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पालघरची पोटनिवडणूक भाजपासाठी अत्यंत कठीण जाणार आहे. पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा भाजपाला हवा असतानाच वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपाची मोठी कोंडी झाली आहे. 

टॅग्स :चिंतामण वनगाभाजपाशिवसेना