मुंबईत मनसेच्या सहा नगरसेवकांचे बळ घेऊन सुरक्षित झालेल्या शिवसेनेचा भाजपाला झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:03 AM2017-12-23T03:03:50+5:302017-12-23T03:04:20+5:30
पालिका निवडणुकीत पारडे जड झाल्यानंतर, वर्षाच्या सुरुवातीला शिवसेनेची कोंडी करणा-या भाजपाचे दिवस आता पालटले आहेत. मनसेच्या सहा नगरसेवकांचे बळ घेऊन सुरक्षित झालेल्या शिवसेनेने आता भाजपाला झटका देण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो प्रकल्पाचे महापालिकेशी संबंधित सर्व प्रस्ताव रोखून धरल्यानंतर, आता मालाड येथील तलावाच्या सुशोभीकरणाचे प्रस्तावही पहारेकºयांचा विरोध डावलून, सत्ताधाºयांनी विरोधी पक्षाच्या मदतीने मंजूर करून घेतला आहे.
मुंबई : पालिका निवडणुकीत पारडे जड झाल्यानंतर, वर्षाच्या सुरुवातीला शिवसेनेची कोंडी करणा-या भाजपाचे दिवस आता पालटले आहेत. मनसेच्या सहा नगरसेवकांचे बळ घेऊन सुरक्षित झालेल्या शिवसेनेने आता भाजपाला झटका देण्यास सुरुवात केली आहे. मेट्रो प्रकल्पाचे महापालिकेशी संबंधित सर्व प्रस्ताव रोखून धरल्यानंतर, आता मालाड येथील तलावाच्या सुशोभीकरणाचे प्रस्तावही पहारेकºयांचा विरोध डावलून, सत्ताधाºयांनी विरोधी पक्षाच्या मदतीने मंजूर करून घेतला आहे.
मालाड पूर्व, कुरार गाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावाच्या (शांताराम तलाव) दुरुस्ती व सुशोभीकरणाला भाजपाचा विरोध होता. या तलावाचे प्रस्तावित काम रद्द होण्यासाठी भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्त अजय मेहता यांच्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वच ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, या तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर असल्याने, पालिका आयुक्तांनी हात वर केले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यातील स्थायी समितीच्या बैठकीत शंकरबुवा साळवी मैदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावाची दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आला असता, भाजपाने तीव्र विरोध केला. हा प्रस्ताव आणण्यापूर्वी पर्जन्य जलवाहिनी आणि मलनिस्सारण प्रचालन यांचे अभिप्राय घेतले का, याचे स्पष्टीकरण भाजपा सदस्यांनी मागविले.
तलावामध्ये सांडपाणी येणार असेल, तर या दुरुस्तीचा काय उपयोग, असा मुद्दा उपस्थित करून, हा प्रस्ताव रद्द करण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपाने केला. मात्र, मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम लवकर सुरू होत असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रस्ताव मंजूर-
मिठी नदीचा परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव याच समितीमध्ये मंजूर करण्यात आला. त्या वेळी यामध्ये मलनिस्सारण वाहिन्यांतील मल सोडले जात असल्याचे समोर आल्यानंतरही हा प्रस्ताव मंजूर केला होता, याचे स्मरण करून देत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी भाजपाला कोंडीत पकडले.
शांताराम तलावात मलवाहिनी टाकल्यानंतर तेथील पाणी शुद्ध करण्यासाठी शुद्धिकरण यंत्र बसविण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाल्यानंतर मतदान घेऊन विरोधकांच्या मदतीने हा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर केला.