मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात शरद पवारांसह शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. यासंदर्भात त्यांनी अनेकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. आता, नेमकं भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली अन् संजय राऊत यांना जामीन मिळाला. त्यामुळेच शिवसेनेच्या वतीनं राहुल गांधींच्या या यात्रेत संजय राऊत सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरुन, त्यांना प्रश्नही विचारले जात आहेत. आता, यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपलाच प्रेमाचा सल्ला दिला आहे.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 10३ दिवसानंतर राऊत तुरुंगातून बाहेर आले. जामीन मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी सर्वप्रथम सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. शिवतिर्थवर जाऊन स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर, दुपारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी प्रकृतीमुळं अद्याप निश्चित नसल्याचं म्हटलं. मात्र, भारत जोडो यात्रा ही कटुता संपवून प्रेमाचा संदेश देणारी यात्रा आहे. त्यामुळे, भाजपनेही भारत जोडो यात्रेचं स्वागत करायला हवं, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
भारत जोडो यात्रा ही कोणाविरुद्ध नसून राष्ट्रीय एकता, एकात्मतेचं ते आंदोलन आहे. देशातील कटुता, द्वेषभावना नष्ट होण्यासाठी सुरू झालेली यात्रा असून भाजपनेही या यात्रेचं स्वागत करायला हवं. कारण, या यात्रेचं काही चुकीचं असल्याचं मला वाटत नाही, असे म्हणत राऊत यांनी प्रेमाचा संदेश दिला. शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, शरद पवार भेटीचा तपशील देत भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं.
मी मोदी, शहांना भेटणार - राऊत
संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवार हे आजारी होते, आता त्यांची प्रकृती ठिक आहे. मी तुरुंगात असताना त्यांनी माझ्या कुटुंबीयांची काळजी घेतली, माझ्यासासाठी न्यायालयीन लढतीत मदत केली. त्यामुळे, त्यांचे आभार मानायला मी आलो होतो. तसेच, मी संसदेच्या अधिवेशनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. यासंदर्भातही शरद पवारांची चर्चा केल्याचं राऊत यांनी सांगितलं.
फडणवीसांची भेट घेणार
'शिवसेना एकच आहे, हा गट आणि तो गट नाही. शिवसेना एकच, ज्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. आम्ही राजकीय लढाई लढू. मी फडणवीसांना भेटणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. राज्याचे काही प्रश्न आहेत. त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडायचे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत, गृहमंत्री आहेत. तुरुंगातीलकाही प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. त्यांना भेटण्यात काही गैर नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, पक्षाचे नाही,'