Join us

‘महाविकास’चीच भूमिका पवारांनी मांडली; भाजपने रोजचा शिमगा थांबवा- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 6:57 AM

शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे आव्हान मोठे असल्यानेच विरोधात बोंब मारली जात आहे.

मुंबई:  भाजपला महाराष्ट्रात पुन्हा येऊ द्यायचे नाही, ही शरद पवार यांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही. महाविकास आघाडीच्यावतीने त्यांनी ती भूमिका मांडली आहे. भाजपमधील आमचे मित्र रोज तारखा देत आहेत, रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवर बंदी आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरूण आमदारांसमोर बोलताना शरद पवार यांनी भाजपला पुन्हा महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे विधान केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले, भाजपच्या रंगात भेसळ आहे. त्यांच्या भेसळीच्या रंगाला आम्ही घाबरत नाही. होळी ही वर्षातून एकदा येते. पण यांचा रोज शिमगा सुरू आहे. आम्ही रोज शिमगा करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रातही खूप खड्डे खोदलेले आहेत; त्यात कोण पडेल हे हळूहळू दिसेल, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला.

शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे आव्हान मोठे असल्यानेच विरोधात बोंब मारली जात आहे. ज्यांचे आव्हान नाही, दंडात ताकद नाही, त्यांच्याकडून ही बोंब मारली जाते. भाजपच्या दंडात ताकद आहे, असे त्यांना वाटते पण ते समोरून वार करत नाहीत. पाठीमागून करतात. ठाकरे सरकारला आता अडीच वर्ष झाले आहेत अजून अडीच वर्ष जातील, असेही राऊत म्हणाले.

भाजपने शिमग्याचा अर्थ समजून घ्यावा आणि त्या पद्धतीने रंग उधळावेत. सध्या कशावरून काय होईल, त्याबद्दल न बोललेले बरे. इतके राजकारण बिघडवून ठेवले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत, खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचे मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार