Join us

भाजपने दाखविला जुन्या शिलेदारांवर विश्वास; नागपुरातून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 6:23 AM

नितीन गडकरी हेच नागपुरातून उमेदवार असतील, असे वृत्त ‘लोकमत’ने सर्वांत आधी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भाजप नेतृत्वाने सहा मतदारसंघांमध्ये नवीन चेहरे दिले असले तरी उमेदवार बदलाची चर्चा असलेल्या मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी दिली.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, त्यामुळे प्रताप पाटील-चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात होती; पण त्यांच्यावरच पक्षाने पुन्हा विश्वास टाकला आहे. वर्धा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी मिळेल, असे म्हटले जात असताना विद्यमान खासदार रामदास तडस पुन्हा मैदानात उतरविले.  सांगलीमधील बदलाच्या चर्चेवरही पडदा पडला तेथे संजयकाका पाटील हेच पुन्हा उमेदवार असतील.

फडणवीस लोकसभेत नाहीत 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे किंवा उत्तर मुंबई मतदारसंघातून लढतील, ही चर्चा काही महिन्यांपासून होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला. राज्यातच राहणार असल्याचे फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते, त्याचा प्रत्यय आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून खा. रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन अन्य शक्यतांवर पक्षाने पडदा टाकला. एकनाथ खडसे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष असेल. अलीकडे भाजपमध्ये गेलेल्या केतकी चौधरी यांना तेथे संधी मिळेल, असे म्हटले जात होते. नागपुरातून नितीन गडकरी, जालन्यातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दिग्गजांवर पुन्हा विश्वास टाकला. गडकरी यांच्या उमेदवारीबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या; पण तसे काहीच झाले नाही. गडकरी हेच नागपुरातून उमेदवार असतील, असे वृत्त ‘लोकमत’ने सर्वात आधी दिले होते.

दुसऱ्या यादीत अनुराग ठाकूर, मनोहरलाल खट्टर यांचे नाव

भाजपच्या यादीत केंद्रीय माहिती व नभोवाणीमंत्री अनुराग ठाकूर (हमीरपूर), संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी (धारवाड), केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे (उत्तर बंगळुरू), हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (कर्नाल), उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत (हरिद्वार), राज्यसभेचे सदस्य अनिल बलुनी (गढवाल), तेजस्वी सूर्या (दक्षिण बंगळुरू), शंकर लालवाणी (इंदूर), राव इंद्रजित सिंह (गुरुग्राम), शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या दादरा नगर हवेली आणि दमन-दीवच्या खासदार कलाबेन डेलकर, तसेच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि ‘आप’मधून भाजपमध्ये दाखल झालेले अशोक तंवर (सिरसा) यांना तिकीट देण्यात आले.

राज्यनिहाय किती उमेदवार? 

महाराष्ट्र    २० गुजरात     २० गुजरात    ७हरयाणा    ६मध्य प्रदेश         ५हिमाचल प्रदेश    २दिल्ली         २उत्तराखंड    २दादरा नगर हवेली     १त्रिपुरा    १

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४भाजपा