ईडी नव्हे तर ‘भाजप प्रदेश कार्यालय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:05+5:302020-12-30T04:08:05+5:30
!, ईडी नव्हे तर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ शिवसैनिकांकडून कार्यालयाबाहेर बॅनर : सोशल मीडियावर व्हायरल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
!,
ईडी नव्हे तर ‘भाजप प्रदेश कार्यालय’
शिवसैनिकांकडून कार्यालयाबाहेर बॅनर : सोशल मीडियावर व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपच्या विरोधातील नेते, त्यांच्या नातेवाइकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) बेलार्ड पियर्ड येथील कार्यालयाचे संतप्त शिवसैनिकांनी नामांतर केले. कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश पार्टी’ या नावाचा मोठा बॅनर लावून निषेध व्यक्त केला. स्थानिक कर्मचारी व पोलिसांनी ताे तेथून तातडीने हटविला. मात्र त्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले.
राज्यातील महाविकास आघाडीचे नेते व त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावण्याचा सपाटा लावला आहे. सोमवारी दुपारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या राजकीय षडयंत्राला शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. त्यानंतर काही वेळातच बेलार्ड पियर्ड येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर काहींनी ‘भाजप प्रदेश कार्यालय’, असा फलक लावला व ते तेथून पसार झाले.
* ... ताेपर्यंत कारवाई हाेणार नाही!
केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयाचे बारसे करण्याचा प्रकार गंभीर असूनही त्याबाबत केलेल्या कारवाईबद्दल रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून कोणतीही माहिती दिली जात नव्हती. एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आनंद होडगे वारंवार फोन कट करीत होते, तर परिमंडळ-१चे उपायुक्त व सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. केंद्रात भाजप आणि राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने त्यांची अडचण झाली आहे. ईडीकडून लेखी तक्रार येत नाही, तोपर्यंत कार्यवाही न करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
.................................