ठाकरेंचा मुंबई पेटवायचा मनसुबा आहे का? अमोल किर्तीकरांच्या प्रचारावरुन BJP चा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 03:39 PM2024-05-09T15:39:14+5:302024-05-09T15:43:53+5:30

ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray over amol kirtikar rally | ठाकरेंचा मुंबई पेटवायचा मनसुबा आहे का? अमोल किर्तीकरांच्या प्रचारावरुन BJP चा सवाल

ठाकरेंचा मुंबई पेटवायचा मनसुबा आहे का? अमोल किर्तीकरांच्या प्रचारावरुन BJP चा सवाल

Chandrashekhar Bawankule : मुंबई उत्तर पश्चिमचे ठाकरे गटाचे उमेदावर अमोल किर्तीकर यांच्या प्रचारफेरीमुळे आता ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. १९९३च्या स्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा अमोल किर्तीकर यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचा व्हिडीओ भाजपने शेअर केला आहे. या प्रकरणावरुन भाजपने आता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचा मशाल दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमोल किर्तीकरांच्या विरोधात शिंदेंच्या सेनेचे रवीद्र वायकर हे निवडणूक लढवत आहेत. अशातच आता अमोल किर्तीकरांच्या प्रचारादरम्यान बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. किर्तीकरांच्या प्रचारात १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान सहभागी झाला होता असं भाजपने म्हटलं आहे. या प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

"१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ व समर्थनार्थ फिरताना दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण, टीपू सुलतान, औरंगजेबाचा उदो उदो मोठ्या प्रमाणात झाला. आणि आता थेट मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या आरोपीकडून उबाठा गटाचा प्रचार केला जात आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ९३ च्या स्फोटानंतर मुंबईला संरक्षण दिलं, पण उद्धव ठाकरे याच स्फोटातील आरोपीची साथ घेत आहेत. आज वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? जनाब उद्धव ठाकरेंना थोडी तरी लाज वाटली पाहिजे! उद्धव ठाकरे तुमची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती देऊन पुन्हा मुंबई आणि देश पेटवायचा मनसुबा आहे का?, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.

मुंबईकरांसाठी काळा दिवस - केशव उपाध्ये

"मुंबईकरांसाठी आजचा काळा दिवस आहे. ज्या मुंबईनं भरभरुन प्रेम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिलं. त्या उद्धव ठाकरेंनी आज भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे की, ते मुंबईकरांसोबत आहे की मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांसोबत आहेत? कारण 1993 चा बॉम्बस्फोट मुंबईकर आजही विसरलेले नाहीत. अशावेळी मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येतेय. आज त्यांचा आत्मा तळमळत असेल. मतांच्या राजकारणासाठी त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे अशा आरोपींसोबत जात असतील, त्याला प्रचारात घेत असतील तर हा मुंबईकरांसोबत झालेला धोका आहे," अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

 

Web Title: BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Uddhav Thackeray over amol kirtikar rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.