Uddhav Thackeray ( Marathi News ) :मुंबई- गेल्या ६३ दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेची आज मुंबईत सांगता होणार आहे, दादरमधील शिवाजी पार्कवर मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी इंडिया आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडीओ ट्विट करुन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "शिवतीर्थ हे महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवतीर्थाशी भावनिक नाते आहे. या शिवतीर्थातून स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांच्या दमदार भाषणाने देशभक्ती, हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला जयघोष झाला.
'याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली होती'.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचेही स्मारक आहे, ज्यांनी म्हटले होते की, ‘मी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही, पण माझे दुकान बंद करू.’ राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीनिमित्त अभिवादन करत नाहीत. ते का करत नाही, असा सवाल राहुल गांधींना विचारण्याची हिंमत उद्धव ठाकरेंकडे असेल का? आदरणीय बाळासाहेबांच्या स्मृतीला राहुल गांधी श्रद्धांजली वाहतील का? असा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात आहे, , असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
"आज या शिवतीर्थावर राहुल गांधी ‘न्याय यात्रा’ या नाटक कंपनीसोबत येणार आहेत. आता या शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का? हा प्रश्न आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला आहे.
"उद्धव ठाकरे वैयक्तिक स्वार्थासाठी विसरले असतील, तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले होते ते ऐका!, असंही बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबईत इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन
६३ दिवस सुरू असलेल्या या यात्रेची आज सांगता होणार आहे. आज रविवार १७ मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यात इंडिया आघाडीचे सर्व दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी होऊन देशाला एकतेचा संदेश देणार आहेत.
"मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम आदमी पार्टी आणि विरोधी आघाडीच्या इतर मित्रपक्षांचे प्रतिनिधीही या रॅलीत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.