भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये इस्रायलच्या अभ्यास दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 03:17 PM2018-02-15T15:17:52+5:302018-02-15T15:18:02+5:30
इस्रायल सरकारच्या निमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते व पक्षाचे प्रदेश माध्यमविभाग प्रमुख केशव उपाध्ये रविवार दि. 18 ते गुरुवार दि. 23 या कालावधीत इस्रायलच्या अभ्यासदौऱ्यावर जाणार आहेत.
मुंबई : इस्रायल सरकारच्या निमंत्रणावरून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते व पक्षाचे प्रदेश माध्यमविभाग प्रमुख केशव उपाध्ये रविवार दि. 18 ते गुरुवार दि. 23 या कालावधीत इस्रायलच्या अभ्यासदौऱ्यावर जाणार आहेत.
इस्रायल सरकारच्या परराष्ट्र विभागाने भारतातील विविध प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी निमंत्रित केले आहे. या प्रवासात इस्रायलच्या परराष्ट्र खात्यातील भारत विभागाचे प्रमुख मायकेल रोनेन व डिजिटल डिप्लोमसी विभागप्रमुख शानी वेस भारतातील प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जेरुसलेमचे उपमहापौर ओफेर बेरकोविच यांच्यासोबत बैठक, इस्रायलमधील विविध राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांशी व माध्यम विभाग प्रमुखांसोबत गप्पा, तेल अविव विद्यापीठातील सोशल मीडिया कार्यकर्ते इदान बिन्यामिन यांच्यासोबत चर्चा, माजी खासदार डॉ. ऐनाट विल्फ आणि राजकीय कार्यकर्ते टोनेर अविताल यांच्याशी गप्पा, तेल अविवचे उपमहापौर असफ झमीर यांच्यासोबत बैठक तसेच राजकीय पत्रकारांसोबत भोजन समारंभ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय प्रवक्त्यांसाठी करण्यात आले आहे.
केशव उपाध्ये यांच्यासमवेत विविध भारतीय प्रवक्ते इस्रायलमधील विकास प्रकल्पांनाही भेटी देणार आहेत. स्टार्ट अप नेशन टूर, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला भेट, सिंचनाविषयीच्या कारखान्यास भेट इत्यादी विकास प्रकल्पांना भेटी देणे नियोजित आहे. या खेरीज बाजारपेठेस भेट, याद वाशेम होलोकॉस्ट म्युझियमला भेट, तेल अविव शहरात फेरफटका, जाफा शहराला भेट तसेच इस्रायलच्या भारतीय संस्कृती केंद्रामध्ये भोजन समारंभ असे काही पर्यटनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत.