कलम ३७०बाबत भाजपा ठाम
By admin | Published: January 3, 2015 02:22 AM2015-01-03T02:22:10+5:302015-01-03T02:22:10+5:30
पीडीपी आणि ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासोबत चर्चा सुरू असली तरी अजून कोंडी फुटलेली नाही, अशी कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमित शहा यांची ग्वाही : अजून कोंडी फुटलेली नसल्याची कबुली
मुंबई : काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेबाबत मेहबुबा मुफ्ती यांची पीडीपी आणि ओमर अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स यांच्यासोबत चर्चा सुरू असली तरी अजून कोंडी फुटलेली नाही, अशी कबुली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्याचवेळी काश्मीरबाबत ३७०वे कलम रद्द करण्याच्या मागणीवर भाजपा ठाम आहे, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
शहा म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून दोन्ही पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मात्र काही मुद्द्यांवर मतैक्य झालेले नसल्याने अजून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. जोरजबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यावर भाजपा ठाम आहे. मात्र यावर सहमती निर्माण करून कायदा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे शहा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. केंद्रात काँग्रेसप्रणीत सरकार असताना देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था भाजपा सरकारने सहा महिन्यांत पूर्वपदावर आणली आहे. महागाईचा दर कमी झाला असून विकासदरात वाढ झाली आहे, असे शहा म्हणाले.
सदस्य नोंदणीवरून कानपिचक्या
राज्यात एक कोटी सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्या दिशेने जोमाने प्रयत्न करण्याचे आदेश शहा यांनी दिले. सदस्य नोंदणीचे लक्ष्य जेवढे लवकर साध्य करता येईल ते पाहा, असे शहा यांनी बैठकीत सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
‘पीके’चे समर्थन
आमीर खानच्या ‘पीके’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी योग्य नाही. चित्रपटाद्वारे मत व्यक्त करण्याचा अधिकार असला पाहिजे, असे शहा म्हणाले. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मंजुरी दिली असल्याने हस्तक्षेप करणे योग्य नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.