Join us

Sudhir Mungantiwar: “मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड, इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”; भाजपची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 10:38 AM

सात अजुबे इस दुनिया का आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे.

मुंबई:महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून सातत्याने टीका, आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षही भाजपला प्रत्युत्तर देत आहेत. आताच्या घडीला राज्यातील काही मुद्द्यांवरून सत्ताधारी ठाकरे सरकार आणि भाजप पुन्हा आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधत जगातील आठवे आश्चर्य असल्याची टीका केली आहे. 

आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशन भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका करत आगामी निवडणुकीत मुंबईत भाजपचा महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त केला. 

इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं

स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे. मला व्यक्तिगतरित्या वाटते की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. जनतेचा विश्वासघात करत आणि जनतेला धोका देऊन हे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं, या शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. 

दरम्यान, क्रुझ ड्रग्स प्रकरणात एनसीबी आणि समीर वानखेडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा कार्यक्रम नवाब मलिक आणि संबंधितांनी बनवला आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप करत असताना आता केंद्र सरकारवर किंवा तपास यंत्रणाना दोषी ठरवण्यासाठी असा ओढूनताणून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातूनच आता ही व्हिडिओ क्लिप आली असावी, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. 

टॅग्स :राजकारणसुधीर मुनगंटीवारउद्धव ठाकरेमहाविकास आघाडी