Maharashtra Assembly Monsoon Session 2023: खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळयाचे नियोजन शासकीय यंत्रणेने अतिशय सूक्ष्म पद्धतीने केले होते; या कार्यक्रमानंतर उष्माघाताने झालेला श्री सदस्यांचा मृत्यू अतिशय दुर्दैवी असून, ही अचानक घडलेली घटना आहे; त्यामुळे यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्याची मागणी योग्य नसून अश्या दुर्घटनांचे राजकारण करणे योग्य नाही, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना सुनावले.
विधानसभेत या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. उच्च न्यायालयाने या संदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे हे निदर्शनास आणून देत सरकार विरोधकांशी दीर्घ चर्चेलाही तयार आहे असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांची एकसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील ना. मुनगंटीवार मुद्देसुद उत्तर देत होते; परंतु विरोधकांनी उत्तर ऐकून न घेता सभागृहात घोषणाबाजी केली.
विधानसभा सदस्य अजय चौधरी, सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सांस्कृतिक कार्यमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. या समितीच्या विनंती वरून समितीला १३ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. मृत्यू झालेल्या १४ व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख याप्रमाणे ७० लाख इतके अर्थसाह्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून करण्यात आले आहेत. सरकारची यंत्रणा तसेच श्री सदस्यांची मोठी टीम या कार्यक्रमाच्या आयोजनात अतिशय सूक्ष्म नियोजन करत होती. पाणी, आरोग्य, वाहन, बैठक अश्या विविध व्यवस्था श्री सदस्यांना विश्वासात घेवून शासकीय यंत्रणा पूर्ण करीत होती .
हवामान खात्याने त्या दिवशीचे तापमान ३४ अंश सेल्सियस असेल असे दर्शविले होते ; पण दुर्दैवाने ते अचानक वाढले आणि १४ जणांना उन्हाचा तडाखा बसला. एवढ्या प्रचंड गर्दीत कुठेही चेंगराचेंगरी झाली नाही किंवा मृतांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या अंगावर तशा खुणा नाहीत. उष्माघात आणि डीहायड्रेशन यामुळे हे मृत्यू झाले ही वस्तुस्थिती आहे असेही मुनगंटीवार म्हणाले. या पूर्वी अशा दुर्घटना राज्यांत घडलेल्या आहेत. नागपूर यथे घडलेला गोवारी मोर्चातील लाठीचार्ज, मांढरदेवी येथील चेंगराचेंगरी, माळीण येथील दुर्घटना यामध्येही अशाच प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाले ; जे घडले ते दुर्दैवीच आहे परंतु याचे राजकारण करु नये, अशी अपेक्षा त्यांनी शेवटी पुन्हा व्यक्त केली.