Join us

राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन न केल्याचा पश्चाताप, भाजपची 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 3:59 PM

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा 2017 मध्येच झाली होती. मंत्रिपदंही ठरली होती

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं मी पुन्हा येईनचं स्वप्न भंगलं. मात्र, भाजपकडून सातत्याने हे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत भाजप 2014 मध्येच सरकार स्थापन करणार होतं, हे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता म्हटले आहे.  

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा 2017 मध्येच झाली होती. मंत्रिपदंही ठरली होती. मात्र, शिवसेनेसोबत आमचं जमणार नाही, असं म्हणत राष्ट्रवादीनं सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला, असं गौप्यस्फोट भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. तर, दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपने राष्ट्रवादीसोबतच युती करायला हवी होती, आता पश्चाताप होत आहे, असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. 

सन 2014 मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. पण, आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवलं. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चादेखील झाली. मात्र, शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावं हे आमचं मत नव्हतं. म्हणून, आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. तसेच, राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली आणि आता त्याचं प्रायश्चित्त आम्ही भोगतोय, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे दररोज राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टिकेची झोड उठवणारे आजही राष्ट्रवादीसोबत नसल्याची खंत बोलून दाखवत आहे. 

काय म्हणाले होते आशिष शेलार?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन वर्षांपूर्वीच अर्थात २०१७मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीसंदर्भात अंतिम बोलणी झाली होती. भाजपाला २०१७ मध्येच राष्ट्रवादीसोबत युती करावी असे वाटू लागले होते. शिवसेनेचे रोज खिशात राजीनामे आणि तोंडात जहर अशी त्रास देण्याची भूमिका असताना राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असे सरकार करावे, अशी चर्चा झाली. पालकमंत्री देखील ठरले. त्यानंतर पुन्हा भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने ठरवले की आपण तीन पक्षांचे सरकार करू, असा घटनाक्रमच आशिष शेलार यांनी सांगितला.  

शेलारांच्या विधानावर अजित पवार म्हणाले

भाजपकडून 2017 मध्ये राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी होण्याची ऑफर होती. मंत्रिपदं ठरली होती. पण राष्ट्रवादीनं नकार दिला, हे सगळं आशिष शेलार आता का सांगताहेत? त्यांनी हे आधीच सांगायचं ना. पाच वर्षानंतर अचानक आता आशिष शेलारांना हे आठवलं का? इतकी वर्षे का थांबले होते?, असे प्रश्न उपमुख्यमंत्री पवारांनी उपस्थित केले.

टॅग्स :सुधीर मुनगंटीवारभाजपाशिवसेनाआशीष शेलारराष्ट्रवादी काँग्रेस