पोलीस बदली रॅकेट संदर्भात भाजपानं घेतलं नवं नाव; बंदा नवाजला वाचवण्याचा सरकारचा डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:00 PM2021-03-26T12:00:46+5:302021-03-26T12:01:54+5:30
Ashish Shelar: बंदा नवाजचे काँग्रेसशी संबंध असून तो पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला उजळमाथ्यानं फिरता यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप
Ashish Shelar: राज्यात पोलीस बदली संदर्भातील रॅकेट कार्यरत असल्याच्या पुराव्यांसंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन सर्व पुरावे सुपूर्द केल्यानंतर आता भाजपानं या प्रकरणात एक नवं नाव जाहीर केलं आहे. "पोलिसांच्या बदली रॅकेटमध्ये बंदा नवाज नावाचा हस्तक असून त्याच्यावर याआधीच ट्रायल सुरू आहे. या बंदा नवाजचे काँग्रेसशी संबंध असून तो पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याला उजळमाथ्यानं फिरता यावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे", असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
"पोलीस बदली रॅकेट संदर्भात मी आज एक गंभीर आरोप करतोय. २०१७ साली देखील असंच एक रॅकेट प्रयत्न करत होतं पण त्याचा वेळीच बिमोड केला गेला. त्यात बंदा नवाज नावाच्या हस्तकामार्फत पोलीस बदलीत पैशाचे व्यवहार होत होते. त्यावेळी योग्य ती कारवाई करुन त्याच्यावर ट्रायल देखील सुरू आहे. हाच बंदा नवाज आता पुन्हा सक्रिय होऊन कारनामे करतोय. बंदा नवाज हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्याला आता वाचविण्यासाठी सरकारचा खटाटोप चालला आहे", असं गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
एटीएसला काम करु दिलं नाही
मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात एटीएसला राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी काम करू दिलं नसल्याचाही आरोप शेलार यांनी यावेळी केला. "मनसुख हिरण प्रकरणात एटीएसला काही ठिकाणी छापे टाकायचे होते. त्यासाठीच्या सहा टीम देखील तयार करण्यात आल्या होत्या. पण ऐनवेळी सरकारकडून छापे थांबविण्यात आले. राज्य सरकारच्या दबावातून या प्रकरणातील अनेक पुराव्यांशीही छेडछाड करण्यात आली आहे", असा आरोप शेलार यांनी केला आहे.
"मनसुख यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडात रुमाल असल्याचं सांगितलं गेलं. पण शवविच्छेदन अहवालात त्यासंदर्भातील कोणताच उल्लेख केलेला नाही. दोन तास शवविच्छेदन चाललं. पण त्याच्या फक्त एक-एक मिनिटाच्या व्हिडिओ क्लिप देण्यात आल्यात. त्यामुळे मनसुख यांनी आत्महत्या केल्याचं दाखविण्यासाठी सरकारी पातळीवरुन दबाव निर्माण करण्यात आला", असंही शेलार म्हणाले.