मुंबई - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे बेस्ट स्टॉपवरील बॅनर फाडला होता. युवासेनेच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी भाजपा बॅनर फाडून निषेध केला होता. त्याला आता भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत शिवसेनेचा बॅनर फाडला आहे.
भाजपा मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा बॅनर फाडला. तेजिंदर तिवाना म्हणाले की, नियमाने परवानगी घेऊन आमच्या नेत्यांचे लावण्यात आलेले बॅनर काढणे आणि त्या बॅनरवर बॅनर लावणे बंद करा अन्यथा हिंदुविरोधी नकली शिवसेनेला जशास तसं उत्तर देऊ त्यासाठी भाजपा युवा मोर्चा सक्षम आहे असा इशारा भाजपानं उद्धव ठाकरेंना दिला आहे.
मुंबईच्या ताडदेव परिसरात शिवसेना, युवासेनेकडून अरुण दुधवडकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेने बेस्ट स्टॉपवर बॅनर लावला होता. हा बॅनर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फाडून टाकला. याच बॅनरखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देणारा बॅनर होता.
काय आहे प्रकरण? वरळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याने तणाव वाढला. यावरून भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. बॅनर फाडणे ही फालतुगिरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची असू शकते. आम्ही बॅनर फाडायचे ठरवले तर मातोश्रीच्या बाहेरचेही बॅनर फाडू पण ही आमची संस्कृती नाही. त्या बॅनरवर गणपती बाप्पाचा फोटो आहे त्यामाध्यमातून गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले होते. हे बॅनर कुणी लावले त्यापेक्षा त्यामागची भावना काय हे समजून घ्यायला हवं होतं. यावर आदित्य ठाकरे जे उत्तर देतात ते बालिशपणाचं लक्षण आहे असा टोला त्यांनी लगावला होता.
मुंबईवर भगवा फडकवू आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि एकनाथ शिंदेंची खरी शिवसेना एकत्र मिळून निवडणूक लढवू आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकवू असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. कुठलीही निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे असं समजलं तर त्यात विजय निश्चित असतो. पूर्ण ताकदीने लढाई लढायची आहे असंही फडणवीसांनी म्हटलं होते.