"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 02:28 PM2022-08-31T14:28:48+5:302022-08-31T14:29:39+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतभाजपानं ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून शहरात बेस्ट बसेसवर जाहिरात झळकले आहेत. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. या बॅनरबाजीच्या माध्यमातून भाजपानं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलनंतर सार्वजनिक वाहतुकीत BEST च्या बसेसचा नंबर लागतो. दिवसाला लाखो प्रवासी बेस्टच्या माध्यमातून प्रवास करतात. बेस्ट ही मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या शहरांतील नागरिकांसाठीही प्रवासी सुविधा देते. यात भारतीय जनता पार्टीने बेस्टच्या बसेसवर या जाहिराती झळकावल्या आहेत. या जाहिरातील आपले सरकार आले, हिंदु सणांवरील विघ्न टळले, गणपती बाप्पा मोरया अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबईत बेस्ट बसेससह बसस्टॉपवरही या जाहिराती लावण्यात आल्या आहेत.
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात आला आहे. सध्या महापालिकेवर आयुक्त इक्बाल सिंह चहल हे प्रशासक म्हणून कामकाज सांभाळत आहेत. महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा गोकुळाष्टमीसह, गणेशोत्सवातही जास्तीत जास्त सहभाग नोंदवत लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महापालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. याठिकाणी मागील निवडणुकीत भाजपानं शिवसेनेला जबरदस्त टक्कर दिली होती. शिवसेना-भाजपा यांच्यातील संख्याबळ अत्यंत कमी होते. अवघे २ नगरसेवक शिवसेनेचे जास्त निवडून आले होते.
परंतु २०१७ मध्ये राज्यात एकत्र सत्तेत असणाऱ्या शिवसेना-भाजपामुळे महापालिकेत भाजपानं महापौर बसवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. महापालिकेत आम्ही पहारेकरी म्हणून राहू असं सांगत भाजपानं सत्तेत सहभाग होण्यासही नकार दिला. त्यामुळे शिवसेनेची एकहाती सत्ता मुंबई महापालिकेवर आली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात शिवसेनेने भाजपाला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिन्ही पक्ष सत्तेत आले त्यामुळे सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं. शिवसेनेच्या या खेळीमुळे भाजपाला धक्का बसला. त्यामुळे आत्ताच्या महापालिका निवडणुकीत वचपा काढण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे.