'काय होतास तू काय झालास तू!', भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:21 PM2019-04-05T12:21:49+5:302019-04-05T12:28:50+5:30

अनेक नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

BJP Targets MNS Chief Raj Thackeray on Cartoon | 'काय होतास तू काय झालास तू!', भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

'काय होतास तू काय झालास तू!', भाजपाचा राज ठाकरेंवर निशाणा

Next

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. अनेक नेतेमंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर निशाणा साधत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रस- राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या अशा घोषणा दिल्या होत्या. मात्र, यंदाच्या म्हणजेच 2019च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या, अशी साद घालत असल्याचे चित्र यामधून दाखवण्यात आले आहे.


दरम्यान,  मनसे आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसेच्या निर्णयाने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला असेल. मात्र, मनसेच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेचे झोप उडणार आहे.  कारण, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शविला होता. परंतु, यंदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी दंड थोपटले आहेत. तसेच भाजपाला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय केला आहे. त्यांमुळे याचा फायदा सहाजिकच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होणार असल्याचे दिसून येत आहे. 

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवित भाजपाच्या विरोधात काम करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. मनसेच्या कार्यकर्ता-पदाधिकाऱ्यांनी थेट काँग्रेस आघाडीच्या प्रचार सहभागी व्हावे की स्वतंत्रपणे भाजपविरोधात प्रचार करायचा, राज ठाकरे नेमक्या किती सभा घेणार आणि कुठे घेणार असे विविध प्रश्न मनसैनिकांनाही पडले आहेत. याबाबत शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरे खुलासा करणार असल्याचे मनसेतील सुत्रांनी स्पष्ट केले.

राज्यात साधारण सहा ते नऊ जागांवर राज यांच्या सभा होतील. यात बारामती, मावळ, नाशिक, नांदेड, सातारा, सोलापूर, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य मुंबई आदी लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, चर्चेतील सर्व मतदारसंघ हे आघाडीच्या दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. त्यामुळे आघाडीतील दिग्गजांसाठी मनसेची तोफ धडाडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Web Title: BJP Targets MNS Chief Raj Thackeray on Cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.