भाजपाच्या चक्रव्युहात शिवसेना अडकणार?; अधिवेशनात होणार हिंदुत्वाची अग्निपरीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 09:35 AM2020-02-26T09:35:52+5:302020-02-26T09:45:55+5:30
Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरुन शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही
मुंबई - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी आहे. ही पुण्यतिथी भाजपाकडून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. मात्र खरी परीक्षा राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची असणार आहे. हिंदुत्ववादी मुद्द्यापासून शिवसेना दूर गेली आहे असा आरोप भाजपाकडून वारंवार करण्यात येतो. सावरकारांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भाजपा शिवसेनेला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरुन शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, सत्तेत भागीदारी असलेल्या काँग्रेसची नाराजी शिवसेनेला घ्यायची नाही. काँग्रेसने वीर सावरकरांबद्दल नेहमी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली होती. ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांना भारतरत्न का द्यायचा असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातो. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत.
महाराष्ट्रात काँग्रेसने छापलेल्या मासिकात सावरकरांचा अपमान केला आहे असा आरोप भाजपाने केला. या मासिकाने सावरकरांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी अलीकडेच भाजपाने केली होती. मात्र या मुद्द्यावर शिवसेनेनं भाष्य करणं टाळलं.
याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, संपूर्ण राज्यभरात वीर सावरकरांची पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. पण शिवसेनेचं सावरकर प्रेम किती खरं आहे हे आज दिसून येईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विधानसभेत शिवसेनेने वीर सावरकरांच्या अभिमानाचा प्रस्ताव आणावा अशी मागणी भाजपाने केली आहे. मात्र भाजपा सरकार असताना सावरकर यांच्याबद्दल प्रस्ताव का आणला नाही असं विचारताच आमच्या काळात सावरकरांचा अपमान करण्याची कोणाची हिंमत नव्हती. त्यामुळे तेव्हा गरज पडली नाही असं त्यांनी सांगितले. मात्र शिवसेनेचं सावरकरांवर किती प्रेम आहे की, फक्त सन्मानाच्या नावाखाली ढोंग करतेय हे जनतेसमोर येईल असा टोला भाजपाने लगावला आहे.
दरम्यान, यापूर्वी भाजपाने सावरकर प्रकरणी काँग्रेसवर आरोप केला होता. काँग्रेसनं राष्ट्रपुरुषांच्या अपमानाची मालिका सुरू केलेली आहे. ती अत्यंत निषेधार्ह आहे. शिदोरीतून 8 फेब्रुवारीच्या अंकात पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय गलिच्छ अशा प्रकारचे लेख लिहिलेले आहेत. ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसनं सावरकरांवर गलिच्छ लिखाण केलं. महाराष्ट्रातही तशाच प्रकारचं गलिच्छ लिखाण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर करण्याचं काम होतंय असा निशाणा देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर साधला होता.