Devendra Fadnavis ( Marathi News ) : मागील वर्षभरापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न धुमसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने या निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचं पाहायला मिळालं. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही आरक्षण फॅक्टरमुळे नुकसान होऊ नये, यासाठी महायुतीतील सर्वच पक्ष सावध झाले असून काल रात्री भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्य पातळीवरील सर्वच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आरक्षण प्रश्नावरून झालेली सरकारची आणि पक्षाची कोंडी फोडण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जावी, याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.
आरक्षण प्रश्नावरून सरकारची दुहेरी कोंडी झाली आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी आग्रही आहेत. तर दुसरीकडे, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास सरकारला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याकडून दिला जात आहे. त्यामुळे दोन्ही आंदोलकांच्या मागण्यांमध्ये सुवर्णमध्य साधत ही कोंडी कशी फोडायची आणि आगामी काळात मराठा आणि ओबीसी समाजासोबत संवाद साधून पक्षाची आणि सरकारची भूमिका कशी पटवून द्यायची, याबाबत भाजपच्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवाससस्थानी झालेल्या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे, आमदार आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह राज्य पातळीवरील इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
भाजप काढणार संवाद यात्रा; कसं असणार आयोजन?
राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवणे आणि त्यांना ठोस कार्यक्रम देण्याच्या उद्देशाने भाजपकडून संवाद यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. ही यात्रा २५ ऑगस्ट ते १० जुलै या काळात होणार असून एकूण तीन टप्प्यांमध्ये ही यात्रा होईल. या संवाद यात्रेत भाजपचे प्रदेश पातळीवरील महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहे.
दरम्यान, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन दोन दिवसांपूर्वी बालेवाडीत पार पडले. या अधिवेशनात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर आता भाजपची पक्षसंघटना अॅक्टिव्ह मोडवर गेल्याचं दिसत आहे.