मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत सध्या राजकीय वातावरण तापले आहे. तसेच, बिहारमधील आगामी निवडणुकीत हा मुद्दा जास्त चर्चेत राहण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीच्या आर्ट कल्चर सेलचे बिहार संयोजक वरुणकुमार सिंह यांनी सुशांतचा फोटो असलेले स्टिकर्स छापले आहेत. या स्टिकर्सवर "ना भूले हैं, ना भूलने देंगे" असे लिहिले आहे. यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं असून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे.
सुशांतसिंह राजपूतला प्रकरणात पहिल्यापासूनच भाजपाची भूमिका आक्रमक राहिली असून हा तपास सीबीआयकडे देण्याची मागणीही भाजपा नेत्यांनी जोर लावून केली होती. याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या १६ जूनपासून भाजपाचे अभियान सुरु आहे, असे वरुणकुमार सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, १४ जूनच्या घटनेनंतर आमच्या शिवाय सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी करणी सेनेने सुद्धा लोकांना स्टिकर्स आणि मास्कचे वाटप केले आहे, असेही वरूणकुमार सिंह यांनी सांगितले. वरुणकुमार सिंह यांनी स्टिकर्स जारी केले आहे. या स्टिकर्सवर दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा हसरा फोटो आहे. 'जस्टिस फॉर सुशांत' असे फोटोच्या वरती लिहिलेले आहे. तर फोटोच्या खाली 'ना विसरणार, ना विसरू देणार' असे लिहिले आहे. तसेच, या स्टिकर्सवर भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ सुद्धा आहे. कमळाच्या चिन्हाखाली 'आर्ट अँड कल्चर सेल, भाजपा, बिहार प्रदेश' असे लिहिले आहे.
दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास निःपक्षपाती व्हावा, अशी भाजपाला इच्छा होती. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यामुळे याला निवडणुकीचा मुद्दा बनवण्याचा काय अर्थ आहे, असे सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी उपस्थित केला आहे.
सुशांतचा कर्मचारी दिपेश सावंतला अटकसुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या ड्रग कनेक्शन प्रकरणी शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी ) शनिवारी रात्री त्याचा कर्मचारी दीपेश सावंत याला अटक केली आहे. दिपेश सावंतची दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर त्याला ड्रग बाळगणे आणि सुशांतला दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रविवारी दिपेश सावंतला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडालाही अटकआज सकाळी सहा वाजताच्या सुमारास सुशांतची गर्लफ्रेंड रियाच्या सांताक्रुज येथील राहत्या घरी आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडाच्या अंधेरी येथील घरावर एनसीबीने छापेमारी केली. यानंतर रियाचा भाऊ शौविक आणि सॅम्युएल मिरांडा यांना एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले. यानंतर शौविक आणि मिरांडा यांना NDPS Act अंतर्गत एनसीबीकडून अटक केली गेली आहे.