गोरेगाव हार्बर विस्तारीकरणाच्या भाजपाच्या श्रेय घेण्यावरून खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल चढवला.यावेळी त्यांनी महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर व त्यांचे चिरंजीव दीपक ठाकूर यांच्यावर कडाडून टीका केली. काम न करता दुसऱ्याचे श्रेय लाटण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. जोगेश्वरी व गोरेगाव रेल्वे स्थानका दरम्यान उभारलेल्या राम मंदिर स्थानकाच्या नामकरणासाठी आपण खासदार म्हणून महानगर पालिकेत व मुख्यमंत्री यांच्याकडून प्रस्ताव मंजूर करून घेतला. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू व गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र काही न करता श्रेय लाटण्यासाठी 22 डिसेंबर 2016 साली राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उदघाटनाच्या वेळी देखील विद्या ठाकूर व तिच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याची आठवण कीर्तीकर यांनी केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर कीर्तीकर यांनी प्रथमच आपल्या आरे रोड येथील पहाडी रोड शाळा मार्गा वरील स्नेहदीप येथील कार्यालयात दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली मनमोकळी मते मांडली.
यावेळी त्यांनी खासदार म्हणून गोरेगाव हार्बर विस्तारीकरणासाठी तसेच राम मंदिर रेल्वे स्थानक नामकरणासाठी काय प्रयत्न केले याचा लेखाजोखा त्यांनी मांडला. गेल्या 28 तारखेला या उदघाटन सोहळ्याला शिवसेनेने बहिष्कार टाकला. कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 7 वाजता, पण मुख्यमंत्री दिल्लीत तर केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयाल यांचे विमान रात्री 8.30 वाजता लँड होणार होते. प्रत्यक्षात मंत्री महोदय या ठिकाणी पोहचले 9.30 वाजता आले. मी तर दिल्लीत होतो, तर उद्योग मंत्री सुभाष देसाई व परिवहन मंत्री दिवाकर रावते 7 वाजता येथे हजर होते. आपल्याला देखील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस आधी उदघाटन कार्यक्रमाची माहिती दिली. विद्या ठाकूर यांनी याचे श्रेय लाटण्यासाठी मुख्यमंत्री व रेल्वे मंत्री यांच्या वेळा घेऊन उदघाटन कार्यक्रम ठरवला. मात्र शिवसेनेच्या घोषणाबाजी व बहिष्कारामुळे या कार्यक्रमाची हवाच निघून गेली अशी टिपणी त्यांनी केली.
15 जानेवारी 2015 रोजी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन सदर हार्बर विस्तारीकरणाकरिता 2015-2016च्या अर्थसंकल्पात मागणी केली. 21 नोव्हेंबर 2015 रोजी झालेल्या मुंबईतील खासदार व पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या बैठकीत अंधेरी ते गोरेगाव हार्बर रेल्वे लाईनच्या कामात येणारे अडथळे कामाची स्थिती यांचा आढावा घेतला. 7 ऑक्टोबर 2016 रोजी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत बहुतांश काम पूर्ण होऊन हार्बर रेल्वे का सुरू होत नाही. असा त्यांना जाब विचारून विलंबाबाबत ठोस कार्यवाहीची मागणी केली. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मी यांनी महाव्यवस्थापकांसोबत बैठका घेऊन त्यांना या प्रकल्पाचे महत्व त्यांना समजावून सांगितले. त्यांचे 100 टक्के पुनर्वसन करून हा रेल्वे मार्ग खुला केला. त्यामुळे गोरेगावपर्यंत हार्बर रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी खरे प्रयत्न आपण व शिवसेनेने केले, असा दावा किर्तीकर यांनी केला.
अण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण आंदोलन फेल गेले. 2011 प्रमाणे त्यांना यंदा तुरळक प्रतिसाद मिळाला. 2011 मध्ये त्यांच्या बरोबर सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व जनता होती. मात्र यंदा अत्यल्प प्रतिसाद त्यांना मिळाला, असे किर्तीकर यांनी सांगितले.