Join us  

Maharashtra Political Crisis: “शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ”; एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 4:32 PM

Maharashtra Political Crisis: एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. याला शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निवासस्थानी जावून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. 

यावेळी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्यासह पक्षातील आमदारांचा एक गट सरकारमधील भाजपत जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस छोडो मोहीम भाजपकडून सुरू आहे का? या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, भाजप थेट कृती करते. त्याचबरोबर शिल्लक राहिलेली काँग्रेस वाटून घेऊ, असे नारायण राणे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी घेतलेला एक निर्णय मला आवडला. मागील अडीच वर्ष असलेले सरकार घरी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तो मला खूपच आवडला. त्यामुळे मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते, अशी खोचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली. 

मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली

ही सदिच्छा भेट होती. जुन्या आठवणी निघाल्या. मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीतील अनुभवांबद्दल चर्चा झाली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. काँग्रेसमधील एक गट सरकारमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यासंदर्भात, काँग्रेसबद्दल बोलत नाही. सभागृहात बोललो आहे. त्यांची जी काय फरफट सुरूये, ती आपण पाहतोय. कुणावर टीका करण्याचा माझा स्वभाव नाहीये, असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही जनतेच्या मनातील भावना जागृत केली. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवे होते. लोकांच्या मनात जे होते, तो निर्णय आम्ही घेतला. बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे घेऊन जातोय. काँग्रेसचे नेते सरकारमध्ये येणार असल्याचे मला माहिती नाही, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, याच मुद्द्यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, काँग्रेसमधून काँग्रेसवाले म्हणून येत नाहीयेत. ते त्यांच्या शिवसेनेत येत आहेत. ते शिवसैनिक होणार. ते उलट चांगले काम करत आहेत. एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील. जी काँग्रेस शिल्लक राहिलेली आहे, ती आम्ही वाटून घेऊ, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळनारायण राणे एकनाथ शिंदेकाँग्रेस