BJP vs Shivsena: शिवसेनेचे खासदार Sanjay Raut यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेते Kirit Somaiya यांच्याबाबत काही आक्षेपार्ह टिपण्णी केली. तसेच, किरीट सोमय्या हे ब्लॅकमेलर आहेत असा आरोपही त्यांनी केला. या आरोपांना किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीतून उत्तर दिलं. त्यावेळी, 'महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी लढणं याला जर कोणी ब्लॅकमेलर म्हणत असेल तर हो मी ब्लॅकमेलर आहे', असं सोमय्यांनी ठणकावून सांगितलं.
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी संजय राऊतांच्या आरोपांना उत्तरं दिली. "संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या ज्या १९ बंगल्यांचा उल्लेख केला ते बंगले गायब असल्याचं मी कधीपासून सांगतोय. त्या जागेवर बंगलेच नसतील तर मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावाने या जागांची घरपट्टी, टॅक्स का भरला जात होता?" असा सवाल यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. "रश्मी ठाकरे आणि बंगल्यांच्या विषयीचा उल्लेख मला टाळायचा होता, पण संजय राऊत यांनी मुद्दाम तसा उल्लेख केला. कारण राऊतांना शिवसेना कठीण प्रसंगात मदत करत नसल्याने त्यांना मुख्यमंत्री व ठाकरे कुटुंबावर खुन्नस काढायची आहे", असा जळजळीत आरोपही सोमय्यांनी केला.
होय, तसं असेल तर मी ब्लॅकमेलर आहे!
"मी रेवदंडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे की मुख्यमंत्र्यांचे १९ बंगले गायब किंवा चोरी झाले आहेत. ही घटना अनेक प्रसारमाध्यमांनी लाईव्ह दाखवली. पण रश्मी ठाकरे या खोटं बोलत आहेत असं मी थेट म्हणणं योग्य नाही. उलट संजय राऊतांनी मुद्दाम हा विषय चर्चेत यावा यासाठी त्या बंगल्यांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आणि मी ब्लॅकमेलर असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्राच्या साडे बारा कोटी जनतेसाठी लढणं याला जर कोणी ब्लॅकमेलर म्हणत असेल तर हो मी सवाई ब्लॅकमेलर आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले.
पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी तुमच्या मुलाची पार्टनरशिप आहे का? या पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. पीएमसी बँकेतील पैसे वापरून स्वत:चा व्यवसाय उभारला आणि वाढवला असे राऊतांनी आरोप केले आहेत, पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही एक दमडीचीही चूक केलेली नाही, त्यामुळे त्यांना वाटत असेल तर उद्धव ठाकरे सरकारने आमची खुशाल चौकशी करावी, असं आव्हानही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिलं.