BJP vs Shivsena Uddhav Thackeray: "मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी मुस्लीम हा छुपा डाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून खेळला जातो आहे. जागर मुंबईचा यातून मुंबईकरांसमोर सत्य घेऊन जाणार आहोत. उद्धवजी यांना मराठी मुस्लिम अजेंडा चालतो पण मराठी जैन, मराठी गुजराती, मराठी उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय आणि तर मराठी हिंदू हा अजेंडा चालत नाही याचं कारण काय आहे?", असा रोखठोक सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला.
"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट मुंबई पालिकेच्या निवडणुकांच्या नावाखाली केवळ मतांच्या तुष्टीकरणापुरते थांबलेले नाहीत. मतांसाठी मराठी माणसाला भुलवायचे आणि मुस्लिमांना फसवायचे असे धर्माच्या मतांचे राजकारण ते करत आहेत. इतकेच नव्हे तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आता पुढे विघटनाकडे चालला आहे. हिंदूमध्ये विघटन कसे होईल यासाठी हळुवार पेरणी केली जात आहे आणि टूलकिटच्या माध्यमातून हिंदू आणि वेगळे नव हिंदू असे दोन गट तयार केले जात आहेत. हिंदूमध्ये दोन गट मांडण्याचे धाडस ओवेसींनीसुद्धा केले नाही, ते धाडस शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केले आहे," असा जळजळीत आरोप शेलार यांनी केला.
"औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबर तुम्ही आता महमंद गजनीचा एजंट तुम्ही बनाता आहात का? असा प्रश्न पडतो आहे. जागर मुंबईचा या कार्यक्रमात विकासविरोधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भ्रम पसरविण्याच्या, तुष्टीकरणाबाबत समस्त मुंबईकराना अवगत करणार आहोत. याच्या बैठका, नियोजन सुरू झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या जागर मुंबईचा या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आमदार अतुल भातखळकर यांच्यावर जबाबदारी देण्यात येत आहे. मुंबई भाजपा या कार्यक्रमातून विरोधकांचे मुखवटे काढेल," असा विश्वासही आशिष शेलार यांनी व्यक्त केला.