भाजप विरुद्ध ठाकरे गटात रंगणार लढत..., भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

By मनीषा म्हात्रे | Published: June 18, 2023 10:37 AM2023-06-18T10:37:21+5:302023-06-18T10:37:34+5:30

ईशान्य मुंबई हा तसा भाजपचा गड मानला जातो. या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुलुंड, भांडूप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द - शिवाजीनगर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.

BJP vs Thackeray group will fight..., tug-of-war for candidacy in BJP | भाजप विरुद्ध ठाकरे गटात रंगणार लढत..., भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

भाजप विरुद्ध ठाकरे गटात रंगणार लढत..., भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

googlenewsNext

मुंबई : राज्यातील सत्ताकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ईशान्य मुंबईत भाजपमध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेच पहावयास मिळत आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या माजी खासदार संजय पाटील यांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपविरुद्ध ठाकरे गट असा अटीतटीचा सामना उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे.

ईशान्य मुंबई हा तसा भाजपचा गड मानला जातो. या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुलुंड, भांडूप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द - शिवाजीनगर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यापैकी मुलुंड पश्चिम आणि घाटकोपर पूर्वेकडील बहुतांश भाग हा गुजराती भाषिक आहे. तर, मानखुर्द-शिवाजीनगर येथील बहुतांश मतदार हा अल्पसंख्याक असून, उरलेला सर्व पट्टा मध्यमवर्गीय कोकणातील माणूस आणि मराठीबहुल आहे. यात विशेषतः मुलुंड, घाटकोपर पूर्व व पश्चिममधील मतदारांवर युतीच्या खासदारांचे भवितव्य अवलंबून असते.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे मनोज कोटक हे खासदार आहेत. मुलुंडमध्ये सध्या भाजपचेच निर्विवाद वर्चस्व असून, भांडूपमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट, भाजप आणि मनसे, तर विक्रोळी-घाटकोपरमध्ये भाजपसोबत अन्य पक्षांचेही प्राबल्य दिसून येते.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे बाहेर काढलेले घोटाळे, मातोश्री आणि ठाकरेंवर केलेले आरोप यामुळे ऐन दसऱ्याला मुलुंडमध्ये सेना आणि भाजपमध्ये राडा झाला होता. यामुळेच युतीच्या काळात सोमय्यांना उमेदवारी न देता भाजपने मनोज कोटक यांना संधी दिली होती. या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघात सेना-भाजप युतीचे उमेदवार मनोज कोटक यांना जनतेने पसंती दिली होती. मात्र हे चित्र आता बदलले आहे. कोटक यांच्याविरोधात पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर वाढताना दिसून येत आहे. 

अन् मनसेला घरचा रस्ता...
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विक्रोळी, भांडूपमधून मतदारांनी मनसेच्या आमदारांना घरचा रस्ता दाखवला. या दोन्ही ठिकाणी सेनेचे सुनील राऊत व अशोक पाटील भरघोस मतांनी निवडून आले. सध्या या लोकसभा मतदार संघात भाजपचे ३, सेनेचे २, तर सपाचा एक आमदार आहे. अशोक पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे.

आधी आघाडीचे वर्चस्व...

२००४ ते २०१४ मध्ये या मतदारसंघावर आघाडीचे वर्चस्व होते. २००४ साली काँग्रेसचे गुरुदास कामत, तर २००९ साली राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील या मतदारसंघातून खासदार झाले होते.  २०१४ ला भाजपचे किरीट सोमय्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले. २०१४ मध्ये सोमय्या यांना ५,२५,२८५ मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना २,०८,१६३ मते मिळाली होती. आपच्या मेधा पाटकर यांना ७६,४५१ मते मिळाली होती. 
त्यानंतर, २०१९ मध्ये सोमय्या यांचा पत्ता कट होऊन नगरसेवक मनोज कोटक यांना संधी मिळाल्याने हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला होता. मागील लोकसभा निवडणुकीत मनोज कोटक यांना ५ लाख १४ हजार ५९९ मते मिळाली. २००९ च्या तुलनेत १० हजार ६८६ मते कमी मिळाली, तर राष्ट्रवादीचे संजय पाटील यांची मागील लोकसभा  निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा तब्बल ७९ हजार ९५० मतांची झालेली वाढ युतीच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. बहुजन वंचित आघाडीच्या निहारिका प्रकाशचंद खोंडाळे यांना ६८,०८९ मते मिळाली होती.

कुठे, कोण आमदार?
मुलुंड - मिहीर कोटेचा (भाजप) 
भांडूप - रमेश कोरगावकर 
(शिवसेना ठाकरे गट)
विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना ठाकरे गट)
घाटकोपर (पूर्व) - प्रकाश मेहता  (भाजप)
घाटकोपर (पश्चिम) - राम कदम (भाजप) 
मानखुर्द शिवाजीनगर - अबू आझमी (समाजवादी पार्टी)

Web Title: BJP vs Thackeray group will fight..., tug-of-war for candidacy in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई