मुंबई-शिंदे गटाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी काल उत्तर पश्चिम विधानसभा निहाय आढावा बैठक घेतली. यावेळी १५८ विधानसभा मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतला.याठिकाणी खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर इच्छुक आहे.मात्र आता या मतदार संघावर भाजपाने दावा केला असून नुकतीच या मतदार संघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेवून त्यांच्याकडे सदर मतदार संघ भाजपाला मिळावा यासाठी साकडे घातले आहे.
या संदर्भात जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राचे भाजप अध्यक्ष अनंत परब यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील भाजप कार्यकर्त्यांची इच्छा नसतांना देखिल केवळ तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होण्यासाठी येथील भाजप कार्यकर्त्यांनी आणि भाजप समर्थक नागरिकांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा प्रचार केला असे या निवेदनात नमूद केले आहे.
जोगेश्वरी पूर्व विधानसभेत तीन वेळा आमदार म्हणून वायकर निवडून आले, मात्र लोकसभेत ते १२००० मतांनी पिछाडीवर पडले.तसेच त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यावर तेव्हा उद्धव सेनेच्या शिवसैनिक व मतदार त्यांच्या बरोबर आले नाही.त्यामुळे त्यांच्या कडे सक्षम उमेदवार व मतदार नाहीत.या विधानसभेत यावेळी भाजपाचा उमेदवार असेल तरच निवडून येईल अन्यथा शिंदे सेनेचा उमेदवार निवडून येणे अशक्य असल्याचे या पत्रात ठामपणे नमूद केले आहे.
या संदर्भात येथील भाजपाच्या चार वेळा नगरसेविका राहिलेल्या उज्वला मोडक यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.या संदर्भात भाजपाला ही जागा मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात माजी नगरसेविका उज्वला मोडक,दिपक खानविलकर, चंद्रेश गातो, रमण झा, अशोक नवले, सुशील पेवेलर, मुकेश गोहिल आदी पदाधिकारी उपस्स्थत होते.