मुंबई :मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून उपनेते अमोल कीर्तिकर यांचे नाव जाहीर केले. मात्र, महायुतीत ही जागा भाजप की शिंदे सेना लढणार, यावर अजून निर्णय झाला नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी ‘अबकी बार चारसो पार’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन आहे. त्यामुळे हा आकडा गाठण्यासाठी मुंबईतील एक, एक जागा जिंकणे भाजपसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे सेनेकडे कडवी लढत देणारा सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी ठाम भूमिका भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी ‘लोकमत’कडे मांडली.
या मतदारसंघातून शिंदे सेनेकडून जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच वायकर यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती.
‘आम्ही काय प्रचार करायचा?’
आम्ही जनतेत जाऊन काय प्रचार करायचा? आमचा उमेदवार ईडी घोटाळ्यातील आहे, त्याला मतदान करा म्हणून सांगायचे का? वायकर यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही जाहीरपणे त्यांचा विरोध करू, आम्ही त्यांचा प्रचारच करणार नाही, असे मोडक यांनी स्पष्ट केले.
१) शिंदे यांनी वायकर यांना उमेदवारी द्यायचा निर्णय घेतल्याचे कळताच जोगेश्वरीतील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले.
२) सोशल मीडियावर त्यांनी व्हिडीओ जारी करत, आम्ही वायकर यांना निवडणुकीत मदत करणार नाही, त्यांच्याविरोधात प्रचार करू, अशी ठाम भूमिका घेतली.