ठाणे : मुंबई, ठाणे महापालिकांच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव असून गेल्या काही वर्षांत दोन्ही महापालिकांमध्ये झालेल्या आर्थिक निर्णयांचा एसआयटी नेमून चौकशी करण्यास शिवसेनेने तयारी दाखवली, तरच युती करण्याची अट भाजपाने पुढे ठेवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शक कारभाराचे केलेले वक्तव्य हे त्याच चौकशीचे सूतोवाच असल्याचे मानले जात आहे.मुंबई महापालिकेतील स्थायी समितीमध्ये सिंडिकेट, तर ठाणे महापालिकेतील स्थायी समितीत गोल्डन गँग कार्यरत आहे. वर्षानुवर्षे या महापालिकांत सत्तेवर असताना शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, कचरा विल्हेवाट, औषधखरेदी आदी कामांत भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले आहेत. मुंबई महापालिकेतील काही कंत्राटदारांना तर घोटाळ्यांकरिता अटक झाली आहे. ठाण्यात बिल्डर सुरज परमार यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी आपल्या डायरीत काही नेत्यांवर आरोप केले. या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याकरिता भाजपाला एसआयटी चौकशी हवी आहे. एसआयटी स्थापन करण्यास शिवसेनेने अनुमती दिली, तर महापालिकांमधील भ्रष्टाचारामुळे तयार झालेल्या अॅण्टी इन्कम्बन्सीचा फटका आपल्याला बसणार नाही, असा भाजपाचा होरा आहे. यापुढे सत्तेकरिता नव्हे तर पारदर्शकतेकरिता युती होईल, हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान त्या एसआयटी चौकशीच्या प्रस्तावाचे अप्रत्यक्ष सूतोवाच असल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)भाजपाची रणनीतीच्सत्तेतील मोठा भाऊ असताना आपण युती तोडली, हा संदेश भाजपाला जाऊ द्यायचा नाही. कारण, युतीच्या वाटाघाटी सुरू असल्याचा देखावा केला, तर भाजपामधील बंडखोरी रोखणे शक्य होईल. भाजपाने शिवसेनेकडे ५० टक्के जागांची मागणी केली आहे. शिवसेना ही मागणी मान्य करणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. च्मात्र, यदाकदाचित शिवसेनेने सत्ता जाऊ नये, याकरिता निम्म्या जागांची मागणी मान्य केली तर मुंबई, ठाणे महापालिकांच्या कारभाराची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपाने केली आहे. ही मागणी मान्य करणे, याचा अर्थ गैरव्यवहाराची अप्रत्यक्ष कबुली देणे असल्याने शिवसेना या अटीला विरोध करील व स्वत:च युती नको, असे जाहीर करील, असा भाजपा नेत्यांचा होरा आहे.
भाजपाला हवी एसआयटी चौकशी
By admin | Published: January 13, 2017 7:09 AM