मुंबई : महापालिका निवडणुकीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतरही हाती धुपाटणे आलेल्या भाजपा नगरसेवकांना सत्तेचा मोह काही सोडता आलेला नाही. पद आणि प्रतिष्ठा दाराशी आली असताना पहारेकऱ्याची भूमिका भाजपातील अनेक नगरसेवकांना मान्य नाही. अखेर त्यांच्या दबावापुढे गुडघे टेकत भाजपाने आपल्या भूमिकेत बदल करीत प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या लढतीला रंगत येणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ८४ जागांवर तर भाजपाने ८२ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला ४ अपक्षांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या जागा ८८ तर भाजपाला एक अपक्ष व अभासेच्या गीता गवळी यांनी पाठिंबा दिल्याने भाजपाच्या जागा ८४ झाल्या. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेना-भाजपामध्ये जोरदार चुरस होती. मात्र भाजपा महापौर, उपमहापौर व कोणत्याही समित्यांची निवडणूक लढवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेचा महापौर निवडून आला. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची करून विजय मिळवल्यावर अशी माघार घेणे भाजपा नगरसेवकांच्या गळी उतरलेले नाही. यामुळे नाराज नगरसेवकांनी किमान प्रभाग समिती लढवू या, असा दबाव पक्ष नेत्यांवर टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पक्षालाही माघार घेऊन अखेर निवडणुकीत उतरावे लागले आहे. (प्रतिनिधी)प्रभाग समित्यांमधील राजकीय समीकरणेएकूण १७ प्रभाग समित्याशिवसेना आणि भाजपा स्वबळावर लढल्यास सेनेला ४ तर भाजपाला ५ ठिकाणी प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळेल.मात्र शिवसेना,भाजपा स्वबळावर लढली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे तटस्थ राहिले किंवा त्यांनी वेगळा उमेदवार दिल्यास सेनेकडे ७ तर भाजपाकडे ८ प्रभाग समित्या ताब्यात येतील.किंवा शिवसेना आणि भाजपाने एकत्र येऊन निवडणुका लढवल्या तर १७ पैकी १६ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद दोन्ही पक्षांना मिळू शकते, असे गणित आहे.
भाजपा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या रिंगणात
By admin | Published: March 16, 2017 3:33 AM