यापुढे हिंदुंवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, भाजपचा सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:00 PM2021-11-22T17:00:24+5:302021-11-22T17:00:47+5:30
यापुढे हिंदुंवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशाराच भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज ठाकरे सरकारला दिला.
मुंबई- त्रिपुरा येथे एका धार्मिक स्थळाची तोडफोड झाल्याच्या अफवेचा आधार घेत नांदेड, अमरावती, मालेगाव येथे हिंसक धार्मिक दंगली घडवून पोलिस-हिंदुवर जीवघेणे हल्ले करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून ठाकरे सरकारने स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्य हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देण्याचा प्रकार चालविला आहे. मुख्यमंत्री व शिवसेनेने सत्तेच्या लालचेपोटी हिंदूची साथ सोडली असली तरीही भाजपा हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. यापुढे हिंदुंवरील भ्याड हल्ले सहन केले जाणार नाहीत, असा इशाराच भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज ठाकरे सरकारला दिला.
नांदेड, अमरावती, मालेगाव येथे हिंसक धार्मिक दंगली घडवून पोलिस-हिंदुवर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ व या संदर्भात हिंदूंच्या भावना राज्य सरकार पर्यंत पोहोचाव्यासाठी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कायमच महाराष्ट्रात अशा प्रकारे धार्मिक दंगल घडविणाऱ्या व १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राज्यात झालेल्या दंगलीत सुद्धा हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे, ही हिंसक दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना तात्काळ अटक केली पाहिजे, स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई तात्काळ बंद झाली पाहिजे व खोटे गुन्हे मागे घेण्यात आले पाहिजे, अशी मागणीही भातखळकर यांनी केली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या नेते–कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत या विविध मागण्यांचे निवेदनसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपा नेते अँड.आशिष शेलार, उत्तर मुंबई भाजपा खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी, आमदार अँड .पराग अळवणी, आमदार सुनील राणे, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह नागरिक व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.