मुंबई : आरएसएस ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांनी प्रज्ञा ठाकूरला भाजपाची उमेदवारी दिली. शहीद हेमंत करकरे अपमान केल्याबाबत तिचा निषेध का नाही केला याचे स्पष्टीकरण शिवसेनेने द्यावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. कुर्ला नेहरुनगर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 2008 च्या हल्ल्यानंतर शहिदांचे छायाचित्र शिवसेना शाखेत लावले गेले आता कुठल्या तोंडाने शहिदांचा अपमान करणाऱ्या भाजपाला मते देणार याचे उत्तर सैनिकांनी द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबई पोलिसांच्या धैर्यामुळे कसाब जिवंत पकडला गेला त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी संबंध समोर आले. ज्या पोलिसांनी देशाचे रक्षण केले त्यांचा अपमान सहन करुन घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पोलिस, निमलष्करी दलाचा आदर करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिकावे. मुख्यमंत्री पदाची नशा चढू देऊ नका असे त्यांनी ठणकावले.
शिवसेनेला भाजपच्या कुबड्यांची गरज का पडली याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. मुंबईकरांनी खोटारड्या मोदींना घरी बसवावे, पर्याय कोण याची काळजी करु नये. देशात लोकशाही आहे त्यामुळे अध्यक्षीय पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी मोदी स्वत: च्या कुटुंबाशी कसे वागले हे पाहावे. पंतप्रधान म्हणतात, आम्ही शिक्षणासाठी कर्ज सुलभ केले मात्र त्यांना जून महिना आल्यानंतर प्रवेशासाठी होणारा त्रास माहित नाही. देशाच्या 23 लाख कोटीचे बजेट पैकी शिक्षणावर केवळ सव्वा टक्के खर्च केला जातो. दहा टक्के खर्च करण्याची गरज आहे. केजी ते पीजी शिक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने शिक्षणामध्ये व्यापारीपणा आणला असा आरोप त्यांनी केला.
उमेदवाराची जात जाहीर केल्याने इतर पक्षांच्या उमेदवारांची पोलखोल झाली. त्यांचे उमेदवार एकमेकांचे नातेवाईक आहेत. ही लोकशाहीमधील नुरा कुस्ती आहे.उमेदवार कोणत्याही पक्षाचे असले तरी सत्ता एकाच घराण्यात असते. त्यामुळे लोकशाहीची थट्टा मांडली गेली आहे. मोदींनी विकासाचा आराखडा मांडला मात्र विकासाऐवजी अधोगती झाली. मोदींनी अजून रॉबर्ट वड्राला तुरुंगात का नाही टाकले याचे उत्तर द्यावे.प्रियांका गांधी वाराणसी मधून मोदी विरोधात लढण्याचे सांगून नवऱ्याची काही प्रकरणे सेटल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोदी सर्वात मोठे ब्लँकमेलर आहेत. त्यांनी आतापर्यंत ब्लँकमेल करुन राजकारण केले आहे . मोदी खोटारडे व्यक्तिमत्व आहे. बालाकोट हल्ल्यामध्ये एकही दहशतवादी मेला नाही याचा खुलासाा सुषमा स्वराज्य यांनी केला आहे .मोदी यांचे वर्तन बालीश असल्याचे ते म्हणाले मोदी यांच्या खोटारडेपणामुळे देश तोंडावर पडला, अशी टीका त्यांनी केली.
आनंदराज आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडीवरील भाजपाची बी टीम ही टीका चुकीची आहे. प्रत्यक्षात कॉंग्रेस भाजपाची ए टीम आहे. कॉंग्रेसने नेहमीच दलित मुस्लिमांची फसवणूक केली. वंचित आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. यावेळी शुजात आंबेडकर, अशोक सोनावणे व निहारिका खोंदले डॉ अनिल कुमार डॉ. संजय भोसले सुरेश शेट्टी सुनील थोरात हे मुंबईतील सर्व सहा उमेदवार उपस्थित होते.
उत्तर मध्य मतदारसंघातील उमेदवार ए. आर. अंजारीया म्हणाले, देश चालवणाऱ्या संविधानाची निर्मिती करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचे देशावर प्रचंड उपकार आहेत. वंचित आघाडीची सभा होऊ नये यासाठी प्रशासन देखील प्रयत्नशील होते असा आरोप त्यांनी केला.
ओवेसींची मुंबईतील प्रचाराकडे पाठ वंचित बहुजन आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील प्रचाराकडे पाठ फिरवल्याने एमआयएम व वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावारण आहे. भिवंडी येथील प्रचारसभेला उपस्थित राहून ओवेसी यांनी ओवेसी यांनी हैद्राबादकडे प्रस्थान केले. आंबेडकर व ओवेसी यांची संयुक्त जाहीरसभा झाली नसल्याने कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.या सभेला एमआयएमचा एकही महत्त्वाचा नेता उपस्थित नव्हता.
वीज नसल्याने सभेत व्यत्यय सभे दरम्यान चार वेळा वीज गायब झाल्याने नेतेमंडळी भाषणे बंद करुन वीज सुरु होण्याची प्रतिक्षा करत होते. सुमारे पंधरा मिनिटे वीज नसल्याने सभेत व्यत्यय निर्माण झाला होता. कार्यकर्ते यावेळी रिॆगण करुन लोकगीते गात होते. वंचितच्या सभेत कार्यकर्ते कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची चौकीदार चोर है ही घोषणा मोठ्या प्रमाणात देत होते.