मराठा आरक्षणाचा विषय भाजपा आक्रमकपणे मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:54 AM2018-07-27T04:54:56+5:302018-07-27T04:56:53+5:30
मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक
मुंबई : मराठा आरक्षणासाठी भाजपा सरकारने केलेले प्रयत्न आणि या समाजाला दिलेल्या सवलतींच्या मुद्द्यावर भाजपाकडून आक्रमकपणे भूमिका मांडली जाणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा याबाबतचा नाकर्तेपणा उघड केला जाणार आहे. उद्यापासून याबाबत रोखठोक भूमिका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री बोलविलेल्या भाजपाचे मंत्री आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व घडामोडींची माहिती दिली. मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेऊ शकत नाही; पण हे आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकार काय काय प्रयत्न करीत आहे हे जनतेसमोर प्रकर्षाने मांडण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली. विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एवढी वर्षे सत्ता असतना मराठा समाजाला काहीही मिळाले नाही. आपल्या सरकारने आरक्षण देण्याची
भूमिका घेतानाच मराठा समाजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले ते प्रभावीपणे जनतेत जाऊन मांडण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपा श्रेष्ठींचे आदेश
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात येणार असल्याची हूल शिवसेनेने उठवून दिल्यानंतर फडणवीस यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.