Join us

भाजप येणार, मुंबई घडवणार... जेपी नड्डांनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 1:44 PM

आसाममधील आमदारांच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देगतपंचवार्षिक महापालिका निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी असल्याने भाजपला महापालिकेत सत्ता मिळू शकली नव्हती.

मुंबई - आगामी वर्षात फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजपचं कमळ खुलवायचं, असा चंग भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी बांधला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांना मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. 

आसाममधील आमदारांच्या मार्गदर्शन शिबिराच्या निमित्ताने नड्डा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकार लोकशाही मार्गानेच हटवू आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारण्यात भाजप यशस्वी होईल, असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला.  भाजप येणार, मुंबई घडवणार... असा नारा देत मुंबईतील भाजपा पदाधिकारी आणि आमदारांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेश स्तरावरील काही ज्येष्ठ नेत्यांशी आणि आमदार मंगलप्रभात लोढा व अतुल भातखळकर यांच्याशी आगामी निवडणुकांच्या तयारीविषयी संघटनात्मक बाबींवरही नड्डा यांनी चर्चा केली. त्यानंतर मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.  दरम्यान, गतपंचवार्षिक महापालिका निवडणुकीत भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेपेक्षा केवळ दोन जागा कमी असल्याने भाजपला महापालिकेत सत्ता मिळू शकली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रयत्ना करण्याच्या सूचना नड्डा यांनी भाजप नेत्यांना दिल्या आहेत. तसेच, ज्या प्रभागात कमी जागा मिळाल्या, त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्यांकडे ताकदीने लक्ष देण्याच्या सूचनाही नड्डा यांनी केल्या आहेत.  

टॅग्स :जगत प्रकाश नड्डाभाजपामुंबईमुंबई महानगरपालिका