भाजप ३० आमदारांचे तिकीट कापणार! चांदा ते बांदापर्यंतच्या दिग्गजांना फटका

By यदू जोशी | Published: June 27, 2019 06:27 AM2019-06-27T06:27:10+5:302019-06-27T06:27:30+5:30

आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी निकषांवर भाजपच्या ३० ते ३२ विद्यमान आमदारांचे तिकिट येत्या विधानसभा निवडणुकीत कापले जाण्याची शक्यता आहे.

BJP will cut 30 MLAs tickit | भाजप ३० आमदारांचे तिकीट कापणार! चांदा ते बांदापर्यंतच्या दिग्गजांना फटका

भाजप ३० आमदारांचे तिकीट कापणार! चांदा ते बांदापर्यंतच्या दिग्गजांना फटका

Next

- यदु जोशी
मुंबई : पाच वर्षांत आमदार म्हणून खराब कामगिरी, ग्राम पंचायतींपासून महापालिकांपर्यंतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील असमाधानकारक कामगिरी, लोकसभा निवडणुकीतील आपल्या मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारास आघाडी न मिळवून देण्यात आलेले अपयश आदी निकषांवर भाजपच्या ३० ते ३२ विद्यमान आमदारांचे तिकिट येत्या विधानसभा निवडणुकीत कापले जाण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रासह देशभरात जोरदार यश मिळाले पण या यशामागे दडलेल्या अपयशाचा बारकाईने अभ्यास करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि एवढेच नव्हे तर पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयानेही सुरू केले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या किमान दोन महिने आधीपासून दोन नामवंत एजन्सी आणि संघ परिवाराशी संबंधित एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जवळपास दोन दिवसांआड सर्वेक्षणे करण्यात आली. संभाव्य उमेदवारांचे रेटिंग ठरविण्यात आले. सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती ही तिकिट वाटपात महत्त्वाची ठरली होती. भाजपने तेव्हा विद्यमान सहा खासदारांचे तिकिट कापले होते.
लोकसभा निवडणुकीत २०१४ च्या तुलनेत ज्या आमदारांच्या मतदारसंघात अगदीच कमी आघाडी भाजप-शिवसेनेला मिळाली वा युती पिछाडीवर राहिली असे आमदारही पक्षाच्या रडारवर असल्याचे बोलले जाते. त्यात काही दिग्गजांचाही समावेश असून चांद्यापासून बांद्यापर्यंत हा निकष लावला जाईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक ज्येष्ठ पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्याकडूनही ‘फीडबॅक’ घेतला जात आहे. तो महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे काही इच्छुकांनी संघाच्या स्थानिक मान्यवरांनी आपल्याबद्दल वर चांगले मत द्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मतदारसंघांची अदलाबदल होणार

भाजपचे विद्यमान आमदार असलेली एकही जागा शिवसेनेला दिली जाणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले असले तरी दोन्ही पक्षांमध्ये किमान पाच ते सात विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघांची अदलाबदल केली जाईल अशी शक्यता आहे. विशेषत: नागपूर, नाशिक व पुणे अशा बहुतांश जागा भाजपकडे असलेल्या शहर/जिल्ह्यांमधील भाजपच्या काही जागा शिवसेनेला जाऊ शकतात.

भाजपने ६ मंत्र्यांना डच्चू दिला होता. त्यात विष्णू सवरा, प्रकाश मेहता,राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, अंबरिशराजे आत्राम हे विधानसभा सदस्य असून त्यांच्यापैकी एखादा अपवाद सोडल्यास इतरांची तिकिटे कापली जाण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय ७५ वर्षांवरील व्यक्तींना उमेदवारी नाही, या पक्षाच्या नियमाचा फटकाही काही जणांना बसेल.

Web Title: BJP will cut 30 MLAs tickit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.