केंद्रातील समित्या, महामंडळांवर भाजप देणार १६० जणांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:55 PM2022-09-21T14:55:14+5:302022-09-21T14:55:46+5:30
राज्य सरकारच्या अखत्यारितील महामंडळे, समित्यांवर भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात ७० : ३० चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे
यदु जोशी
मुंबई : राज्यातील महामंडळे व समित्यांवरील नियुक्त्यांना मुहूर्त सापडत नसताना आता केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध समित्या आणि महामंडळांवर राज्यातील भाजपच्या १६० नेत्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठीची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेल्या ४० जणांचा या १६० जणांमध्ये समावेश आहे. काही आमदार, खासदार, आजी-माजी आमदार, खासदारांनाही त्यात संधी दिली जाणार असल्याचे समजते.
राज्य सरकारच्या अखत्यारितील महामंडळे, समित्यांवर भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात ७० : ३० चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, केंद्र सरकारशी संबंधित पदांबाबत असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे केवळ भाजपच्या नेत्यांची नावे दिल्लीला पाठविली जातील. या यादीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंतिम रूप दिले आहे, असे सूत्रांनी सांगितले.
भारतीय यांच्याकडे नवीन जबाबदारी आतापर्यंत प्रदेश भाजपचे सरचिटणीस असलेले आ. श्रीकांत भारतीय यांना आता संघटनात्मक बळकटीकरण अभियानाचे प्रदेश संयोजकपद देण्यात आले आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना मंगळवारी दिले. भाजपची शक्ती कमी असलेल्या आणि गेल्यावेळी पराभूत झालेल्या ७८ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाला बळकटी देण्यासाठीची जबाबदारी त्यांच्याकडे असेल.
संघटन सरचिटणीस रा.स्व.संघाकडून येणार?
सरचिटणीस (संघटन) म्हणून आतापर्यंत श्रीकांत भारतीय हे जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांच्या जागी रा.स्व.संघाकडून पूर्णवेळ प्रचारक असलेल्या व्यक्तीची नियुक्ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. विजय पुराणिक यांच्यानंतर या पदावर संघाकडून व्यक्ती नेमण्यात आलेली नाही.
सरचिटणीसांना केले जबाबदाऱ्यांचे वाटप
आधीच्या सरचिटणिसांना काढून पाच नवीन सरचिटणीस नेमण्यात आल्याने भाजपमध्ये धुसफूस असल्याचे म्हटले जाते. जानेवारीत नवीन कार्यकारिणी नेमण्यात येणार असून, तोवर आताचे पाच आणि आधीचे सहा सरचिटणीस कायम ठेवावेत, असा दबाव काही नेत्यांकडून आणला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. नवीन पाच सरचिटणिसांना जबाबदाऱ्यांचे वाटप मंगळवारी करण्यात आले. त्यानुसार आ.रणधीर सावरकर - विदर्भ, विक्रांत पाटील - तळकोकण, माधवी नाईक- कोकण, मुरलीधर मोहोळ- पश्चिम महाराष्ट्र, संजय केणेकर- मराठवाडा अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
आधी सहा सरचिटणीस होते आणि त्यांच्याकडे सहा विभागांची जबाबदारी होती. यावेळी केंद्रीय नेतृत्वाने पाचच सरचिटणीस नेमण्यास मंजुरी दिली. सहावे सरचिटणीस नेमण्यास बावनकुळे यांनी परवानगी मागितली आहे. ती मिळेपर्यंत प्रदेश कार्यालयाचे मुख्य प्रभारी रवी अनासपुरे यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असेल.