मुंबई: २०१९ मध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याबाबत शरद पवार यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानुसारच मी व अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद घेण्याचे ठरले, पण पहाटेच्या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी शरद पवार मागे फिरले व त्यांनी दुटप्पी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माझी भेट घेऊन चर्चा केल्याचे आणि दोन दिवसांनी मी भूमिका बदलल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर, दोन दिवसांनी त्यांनी चोरून शपथ का घेतली, असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला. पहाटेच्या शपथविधीनंतर महाविकास आघाडीचा झालेला शपथविधी हा पवारांच्या राजकीय खेळीचा डाव होता का, असे विचारल्यावर "हा डाव वगैरे होता किंवा नाही हे तुम्हीच ठरवा. मात्र, त्यात कोण फसले, हे सर्वांनी पाहिले आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. त्यावेळी राष्ट्रपती राजवट कधी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. तिन्ही पक्षांच एक मत होतं की, बहुमताचा आकडा सिद्ध केला तरीही राज्यपाल बहुमत मानणार नाही. आपल्याला झुलवत ठेवतील बहुमत मान्य करणार नाही. एका भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला, असं विधान संजय राऊतांनी केले. शरद पवारांचे एकाच वेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही होते. शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपाला शंभर जन्म घ्यावे लागतील, हे मी आजही म्हणतो. त्या गुगलीत देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष क्लीन बोल्ड झाला, असा दावा संजय राऊतांनी केला.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचे ठरवले. आम्ही पर्यायाचा विचार करत असताना राष्ट्रवादीचे काही लोक म्हणाले की, आपण मिळून स्थिर सरकार देऊ शकतो. त्यानुसार शरद पवार यांच्याशी आमची बैठक झाली. सरकार स्थापन करायचे, ते कसे चालविले जाईल वगैरे सगळे ठरले. तसा करारदेखील झाला. पवारांनी या सरकारसाठी आशीर्वादही दिले. पण एका क्षणी अचानक शरद पवार मागे हटले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
अर्धेच सत्य बाहेर....
मला अतिशय आनंद आहे की, पवार साहेबांना सत्य सांगावे लागले. त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड होण्याऐवजी त्यांचे पुतणेच बोल्ड झाले. अर्धेच सत्य बाहेर आले, पूर्ण सत्य लवकरच बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया नंतर फडणवीस यांनी दिली.
फडणवीस अज्ञानी
१९७८ च्या पुलोदच्या प्रयोगावेळी आम्ही एस. काँग्रेस म्हणून काँग्रेसच्या विरोधात लढलो होतो. त्यानंतरची समीकरणे वेगळी होती. सत्तेसाठी आम्ही एकत्रित आलो होतो. फडणवीस लहान असल्याने त्यांचे अज्ञान स्पष्ट होत आहे, असा टोला पवारांनी लगावला.