लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाकडे तसेच ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी प्रदेश भाजपच्या वतीने राज्यभरात २० हजार सभा, बैठका घेण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्र परिषदेत ही माहिती दिली.
भाजप जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाटील यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात बिनदिक्कतपणे गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. भाजपच्या दबावानंतरच संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मनसुख हिरेन यांचा मृत्यू जसा संशयास्पद आहे तशीच या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारची भूमिकाही संशयास्पद वाटते. मराठा आरक्षणाचा घोळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळे झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. वीज बिलांमुळे सामान्य वीजग्राहक हैराण झाला आहे. आता या मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी भाजपच्या २० हजार शक्तिकेंद्रांतर्फे २० हजार सभा, बैठका घेण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.