मुख्यमंत्री ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मास्टरप्लान तयार; भाजपाने 'ते' व्हिडीओ शोधले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 01:20 PM2021-08-25T13:20:22+5:302021-08-25T13:26:47+5:30

शिवसेनेने भाजपाविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे.

BJP will lodge complaints against CM Uddhav Thackeray in 5 police stations in Yavatmal district. | मुख्यमंत्री ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मास्टरप्लान तयार; भाजपाने 'ते' व्हिडीओ शोधले

मुख्यमंत्री ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मास्टरप्लान तयार; भाजपाने 'ते' व्हिडीओ शोधले

googlenewsNext

मुंबई: अत्यंत नाट्यमय घडामोडींनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर रात्री उशिरा पडदा पडला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जल्लोष केला. नाशिक आणि पुणे पोलिसांनीही राणे यांचा ताबा मागितला नाही. त्यामुळे राणेंना मोठा दिलासा मिळाला.

शिवसेनेने भाजपाविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता भाजपाने देखील प्रत्युत्तर देण्याचे ठरविले आहे. दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजपा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. त्यासाठी लागणारे व्हिडिओ देखील भाजपाने शोधले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. त्यामुळे राजकारण पुन्हा तापणार असल्याचं बोललं जात आहे. 

तत्पूर्वी, शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यावरुन आता भाजपाने देखील तक्रार दाखल करण्याचे ठरविले आहे. 

दरम्यान, सोमवारी महाड येथे राणे यांनी ‘मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली चढवली असती,’ असे विधान केले होते. या विधानाबद्दल महाड, पुणे आणि नाशिक येथे राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. त्यानंतर राणे यांना अटक केली जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. राणे यांच्या अनुद्गाराचे राज्यात तीव्र पडसाद उमटले. शिवसैनिकांनी  राणे यांच्या पोस्टरला काळे फासणे, जोडे मारणे, पुतळा दहन यासारखी आंदोलने केली. भाजपची कार्यालये लक्ष्य करीत तोडफोड केली होती. 

गोळवली येथे घेतले होते ताब्यात

राणे सोमवारी रात्रीच चिपळूणमध्ये दाखल झाले. तोपर्यंत त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणच्या दिशेने निघाल्याचे वृत्त आले होते. चिपळूणमधील कार्यक्रम आटोपून ते रत्नागिरीकडे निघाले. गोळवली येथे स्व. गोळवलकर गुरुजींच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. तेथेच पोलीस फौजफाटा दाखल झाला. तेथेच त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: BJP will lodge complaints against CM Uddhav Thackeray in 5 police stations in Yavatmal district.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.