भाजपला युपी, बिहारमधील सत्ता गमवावी लागेल- आझमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 06:04 AM2020-02-16T06:04:11+5:302020-02-16T06:04:26+5:30
यावेळी आझमी म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढयात ज्यांनी सहभाग घेतला नाही ते देशभक्ती शिकवत आहेत.
मुंबई : सरकार म्हणजे देश नाही त्यामुळे सरकार बदलले तरी देश बदलणार नाही. सीएए, एनआरसी,एनपीआरमुळे भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेली आहे, त्यासोबत येत्या निवडणुकीत युपी ,बिहार येथील सत्ता गमवावी लागेल असे सपाचे आमदार अबू आझमी यांनी सांगितले. सीएए, एनआरसी, एनपीआर विरोधी महामोर्चात ते बोलत होते.
यावेळी आझमी म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढयात ज्यांनी सहभाग घेतला नाही ते देशभक्ती शिकवत आहेत. आज देशात सीएए, एनआरसी, एनपीआर सारखे कायदे आणले जात आहेत. परंतु दरवर्षी देशात जनगणना होत असताना आशा कायद्यांची गरज नाही. जर मोदी सरकारला हा कायदा लागू करायचा होता तर निवडणूकपूर्व करायला हवा होता. १२० कोटी लोकांचे मत घेऊन सत्तेत आले आणि आता हे कायदे आणले आहेत. तसेच मत घेण्यासाठी पॅन कार्ड, वोटिंग कार्ड,आधार कार्ड चालते पण तेच सीएएला का चालत नाही, असा सवाल त्यांनी विचारला. भाजपने यापूर्वी, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राज्यस्थान ही राज्य गमावली आहेत. येत्या निवडणुकीत बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल. महाराष्ट्रमध्ये महा विकास आघाडीचे सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सीएए, एनआरसी,एनपीआरमुळे एकाही व्यक्तीचे नुकसान होऊ देणार नाही,असा शब्द दिला आहे. सर्व मिळून त्याचा विरोध करू असे सांगत कोणीही कागद दाखवू नका, असे आवाहन केले.
केंद्र सरकारने देशात सीएए, एनआरसी , एनपीआर सारखे कायदे आणले आहेत. हे कायदे सरकार जनतेवर लादले जात आहेत. पण जनतेची ताकद सर्वात मोठी असते. कोणतीही शक्ती जनशक्ती पुढे टिकू शकत नाही.
बी जी कोळसे पाटील,
निवृत्त न्यायाधीश