भाजपला आता कधीच अच्छे दिन येणार नाहीत, सांगलीतील विजयानंतर राष्ट्रवादीला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 05:54 PM2021-02-23T17:54:31+5:302021-02-23T17:54:55+5:30
सांगली महापौर पदाची आज निवडणूक झाली असून भाजपचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी झाले आहेत.
मुंबई - पूणे पदवीधर निवडणूक राष्ट्रवादीने जिंकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होणार हे संकेत मिळाले होते आणि त्याच्यावर सांगली महापौर विजयाने शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश भारत तपासे यांनी दिली. तसेच, यापुढे भाजपाला राज्यात कुठेच अच्छे दिन येणार नाहीत,असे भाकितही त्यांनी केलंय.
सांगली महापौर पदाची आज निवडणूक झाली असून भाजपचा पराभव करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे दिग्विजय सुर्यवंशी विजयी झाले आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि सांगली पालकमंत्री जयंत पाटील यांचे हे काम नक्कीच उल्लेखनीय आहे असेही महेश भारत तपासे यांनी सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत सातत्याने जयंत पाटील यांच्यावर वेगवेगळी वक्तव्ये करताना दिसत होते परंतु पुणे पदवीधरची निवडणूक झाली आणि आजची निवडणूक होऊन भाजप पश्चिम महाराष्ट्रातून हद्दपार झाल्याची जोरदार टीका महेश भारत तपासे यांनी केली आहे. भाजपला आता भविष्यात कधीच अच्छे दिन येणार नाही हे महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी स्वीकारून दाखवून दिले असल्याचेही महेश भारत तपासे यांनी स्पष्ट केले.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांचा महापौरपदी विजय झाला आहे. या विजयाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडी सरकारला स्वीकारले आहे व भाजपाला बाहेरचा दरवाजा दाखवला आहे.
— Mahesh Bharat Tapase महेश भारत तपासे (@maheshtapase) February 23, 2021
#राष्ट्रवादीपुन्हाhttps://t.co/t0uhjKDH9q
सांगलीतील भाजपाची सत्ता संपुष्टात
महापालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू ऑनलाईन पद्धतीने झाली. ७ नगरसेवक फुटल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन नगरसेवक गैरहजर राहिले. महापौेर राष्ट्रवादीचा बनल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे. भाजपची अडीच वर्षाची सत्ता संपुष्टात आली.