मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून वाद विकोपाला गेल्याने शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटली आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये युती तुटण्याचे काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, युतीमध्ये आलेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीबाबत भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाक़डे आवश्यक संख्याबळ नसल्याने भाजपा मुंबई महापौरपदाचीनिवडणूक लढवणार नाही, असे भाजपा नेते खासदार मनोज कोटक यांनी जाहीर केले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला होता. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तावाटपाचा समान फॉर्म्युला ठरलाच नसल्याचा दावा भाजपाने केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तास्थापनेसाठी बोलणी सुरू केली होती. त्याची परिणती शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती तुटण्यामध्ये झाली होती. त्यामुळे युती तुटण्याचे कोणते पडसाद मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निव़डणुकीत कोणते पडसाद उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, मुंबई महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या मुंबई महानगरपालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावत असलेल्या भाजपाने पालिकेच्या महापौरपदाच्या निडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना भाजपा नेते आणि खासदार मनोज कोटक यांनी सांगितले की, ‘’महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ आमच्याकडे नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र २०२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर विराजमान होईल, असा विश्वास कोटक यांनी व्यक्त केला.