पूरग्रस्त भागातील शंभर शाळांची भाजपातर्फे दुरुस्ती करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:22 PM2019-08-29T22:22:00+5:302019-08-29T22:22:26+5:30
प्रदेश भाजपच्या पूरग्रस्त सहाय्यता समितीतर्फे पूरग्रस्त शंभर गावांतील शाळांची साफसफाई व दुरुस्ती करून देण्यात येईल, असा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर केला.
मुंबई ; प्रदेश भाजपच्या पूरग्रस्त सहाय्यता समितीतर्फे पूरग्रस्त शंभर गावांतील शाळांची साफसफाई व दुरुस्ती करून देण्यात येईल, असा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी जाहीर केला.
समितीची बैठक मुंबईत प्रदेश कार्यालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस समितीचे संयोजक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, नीता केळकर व किरीट सोमैय्या, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., भाजपा सांगली शहराध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ व भाजपा सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांसह राज्यात काही ठिकाणी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. तेथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले होते. भाजपाचे खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच असे २० हजारपेक्षा अधिक लोकप्रतिनिधी असून त्यांनी दिलेल्या निधीतून आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निधीतून पूरग्रस्तांसाठी निधीसंकलन झाले आहे. त्याचा विनियोग करण्याबाबत गुरुवारच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये असे ठरले की, पूरग्रस्त शंभर गावातील शाळांची साफसफाई व दुरुस्ती भाजपतर्फे करण्यात येईल. पुराच्या पाण्यामुळे शाळांमध्ये बुरशी वाढली आहे, तेथे पेस्ट कंट्रोल केले जाईल. भिंती पडल्या आहेत किंवा कुंपण पडले आहे तेथे दुरुस्ती करण्यात येईल. पूराच्या पाण्यात बुडालेल्या शाळांची रंगरंगोटी करून देण्यात येईल. या कामासाठी गावातील लोकांचीच समिती तयार करण्यात येणार आहे. गावातील कंत्राटदार ठरेल व समितीतर्फे दर आठवड्याला त्या त्या गावचा प्रमुख सांगेल त्याप्रमाणे निधी देण्यात येईल.