फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी; खडसेंना दिल्लीत पाठवण्याची शक्यता, राणेंचाही होकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 01:18 PM2018-03-10T13:18:31+5:302018-03-10T13:18:31+5:30

गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून राज्यसभेसाठी नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती.

BJP will send Eknath Khadse and Narayan Rane in Rajya Sabha election 2018 | फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी; खडसेंना दिल्लीत पाठवण्याची शक्यता, राणेंचाही होकार?

फडणवीसांचे एका दगडात दोन पक्षी; खडसेंना दिल्लीत पाठवण्याची शक्यता, राणेंचाही होकार?

Next

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्यात त्यानुसार भाजपच्या गोटातून दररोज नव्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर भाजपाला ३ उमेदवार राज्यसभेवर पाठवता येतील. त्यामुळे या तीन जागांवर कोणाची वर्णी लागणार, याविषयी राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून राज्यसभेसाठी नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. 

मात्र, शनिवारी भाजपाकडून एक अनपेक्षित नाव पुढे आले. सूत्रांच्या माहितीनुसार, गैरव्यवहाराच्या आरोपामुळे सध्या मंत्रिमंडळातून बाहेर असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याविषयी भाजपच्या गोटात जोरदार खलबते सुरू आहेत. खडसे यांच्यावरील गैरव्यवहाराचे आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी समर्थकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे. खुद्द खडसे यांनीही जाहीर व्यासपीठांवर आपल्या मनातील खदखद बोलून फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना थेट दिल्लीत पाठवण्याची चाणाक्ष खेळी खेळल्याची शक्यता आहे. जेणेकरून खडसे यांना न्याय दिल्याचेही भासवता येईल आणि दुसरीकडे राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करण्यापासून त्यांना दूरही ठेवता येईल. मात्र, एकनाथ खडसे यांना हा प्रस्ताव कितपत मान्य होईल, याबाबत शंकाच आहे. याशिवाय, तिसऱ्या जागेवरून प्रकाश जावडेकर यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याची भाजपाचा इरादा आहे. ते 2012 मध्ये मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून गेले होते. 

दुसरीकडे राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या नारायण राणे यांचेही मनपरिवर्तन करण्याता भाजपाला यश मिळाल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी  नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. नितेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राणे साहेबांनी दीर्घकाळ राज्याच्या राजकारणातच राहावे, अशी माझ्यासारख्या हितचिंतकांची इच्छा आहे. महाराष्ट्राला त्यांची आणखी गरज आहे. त्यामुळे राणे साहेबांनी राज्यसभा नव्हे तर विधानसभेत जावे, अशी आमची इच्छा आहे. राणेसाहेब आमची ही मागणी लक्षात घेतील, अशी आशा करतो. आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत आहोत, असे नितेश यांनी म्हटले होते. 

Web Title: BJP will send Eknath Khadse and Narayan Rane in Rajya Sabha election 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.